(नागपूर)
भाजप नेत्या सना खान यांची हत्या करणारा जबलपूरमधील कुख्यात दारु माफिया आणि वाळू तस्कर अमित ऊर्फ पप्पू शाहूला जबलपूरमध्ये अटक झाली आहे. सना उर्फ हिना खान संशयास्पदरित्या बेपत्ता झाल्याप्रकरणी मानकापूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. एक दिवसआधीच पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून याप्रकरणी एक पथक जबलपूरला पाठवले होते. त्याचवेळी चौकशीत आरोपीने हत्येची कबुली दिली आहे. अमित साहू हा जबलपूरमध्ये अवैध मार्गाने रेतीची तस्करी करतो. त्याच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या सना खान १ ऑगस्ट २०२३ पासून बेपत्ता होत्या. ती तिच्या बिझनेस पार्टनरला भेटण्यासाठी मध्य प्रदेशातील जबलपूरला गेल्या होत्या. सना यांनी घरच्यांना दोन तीन दिवसांत परत येईल, असे सांगितले होते. आठवडा उलटूनही सना घरी न परतल्याने आणि त्यांचा फोन बंद असल्याने घरच्यांनी नागपूरच्या मानकापूर पोलिस ठाण्यात त्या हरवल्याची तक्रार दाखल केली. तसेच सना जबलपूरमध्ये त्यांचा बिझनेस पार्टनर अमित शाहला भेटण्यासाठी गेल्या होत्या, अशी माहिती घरच्यांनी पोलिसांना दिली.
अमितचा दारू तस्करीत सहभाग असून तो जबलपूरजवळ ढाबा चालवत होता. पैशाच्या व्यवहारावरून सना आणि पप्पूमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता, असेही सांगण्यात आले. पोलिसांचे पथक पोहोचण्यापूर्वीच अमित साहू कुटुंबासह ढाबा बंद करून पळून गेल्याचे पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. तेव्हापासून पोलीस त्याचा सतत शोध घेत होते. अखेर त्याला जबलपूरमधून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
चार महिन्यांपूर्वीच आरोपीशी विवाह
सना खानने चार महिन्यांपूर्वी आरोपी अमित उर्फ पप्पू साहूशी लग्न केले होते. आरोपीचे हे दुसरे लग्न होते. यापूर्वी त्याचे एका महिला पोलीस कर्मचाऱ्याशी लग्न झाले होते. मात्र आरोपीच्या चुकीच्या कामामुळे पोलीस कर्मचाऱ्याने त्याला घटस्फोट दिला होता. त्याने या वर्षी एप्रिलमध्ये सनासोबत लग्न केले होते.