(नवी दिल्ली)
जगभरातील यूजर्ससाठी अनोळखी नंबरवरून फोन येणे एक मोठी तशीच गंभीर समस्या आहे. तसेच अनेकांना फसवणुकीच्या प्रकारांमुळे अनोळखी नंबरची भीतीदेखील वाटते. याच गंभीर समस्येवर लक्ष केंद्रित करून आता ट्रायकडून एक नवीन सुविधा अमलात आणली जात आहे. या सुविधेमुळे वापरकर्त्यांची अनोळखी नंबरपासून सुटका होणार आहे. कारण नव्या सुविधेनुसार आता जी व्यक्ती तुम्हाला कॉल करेल, त्या व्यक्तीचे नाव तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह केलेले नसले तरीही ते नाव तुम्हाला दिसणार आहे. फसवणुकीला आळा घालण्यासाठी केंद्राने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
या योजनेअंतर्गत आता जर एखाद्या व्यक्तीला नवीन सीमकार्ड घ्यायचे असेल, तर त्यासाठी भरण्यात येणारा केवायसी फॉर्मवर त्याला स्वत:ची सर्व खरी माहिती भरावी लागेल. शिवाय त्या फॉर्मवर सीमकार्ड वापरकर्त्याचे जे नाव असेल, तेच नाव त्या व्यक्तीने इतरांना कॉल केल्यावर दिसणार आहे. ट्रायच्या या नवीन उपक्रमामुळे अनेक जणांची अनोळखी नंबरमुळे होणा-या त्रासापासून सुटका होणार आहे.
शिवाय आजकाल ही ऍप्स तुमच्याकडून ते देत असलेल्या सेवेचे मूल्यदेखील आकारतात, तर या ऍप्सद्वारे मिळणारी माहितीदेखील पूर्णपणे खरी असेल, असा दावा करता येत नाही. त्यामुळे आपली काही प्रमाणात फसवणूक होण्याची शक्यता असते. मात्र, सध्या ट्रायद्वारे केवायसी आधारित जी सेवा सुरू करण्यात येणार आहे, त्याद्वारे ग्राहकांना १०० टक्के अचूक माहिती मिळणार आहे.
सध्या आपल्याला अनोळखी नंबर कोणाचा आहे, हे पाहता येते. त्यासाठी आपण ट्रुकॉलरसारख्या ऍप्सचा वापर करतो. मात्र तो खात्रीशीर मार्ग नाही. तसेच, ट्रुकॉलरसारखी ऍप्सना तुमच्या मोबाईलमधील अन्य डाटा मिळण्याची शक्यता असते. हे लक्षात घेता ट्रायची सुविधा मोबाईल ग्राहकांच्या फायद्याची ठरणार आहे. स्पॅम कॉलपासून दूर राहण्यासाठी सरकार आणि स्मार्टफोन ओईएमच्या प्रयत्नानंतर हे पाऊल पूर्ण कॉलिंग नेटवर्कमध्ये पारदर्शिकता आणू शकणार आहे.