[रत्नागिरी/प्रतिनिधी]
जिल्ह्यातील अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती प्रवर्गामधील शेतकऱ्यांसाठी प्रतीथेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन योजना, ठिबक, तुषार सिंचन योजना राबविण्यात येत आहे. सदर प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी दि. २९ ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत असून शेतकऱ्यांची संख्या वाढविणे हाच त्यामागील मुख्य उद्देश आहे. कृषि सहाय्यकामार्फत प्रत्येक गावातील या प्रवर्गामधील शेतकऱ्यांना योजनेची माहिती देऊन महाडीबीटीच्या पोर्टलवर अर्ज सादर करण्याचे आवाहन केले जाणार आहे.
विविध योजनांच्या माहितीसाठी ग्रामपातळीवर कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन योजनेंतर्गत बहुधारक शेतकऱ्यांना ४५ टक्के, अल्प, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ५५ टक्के अनुदान दिले जाते. मुख्यमंत्री शाश्वस्त शेती सिंचन योजनेतून ७५ ते ८० टक्के अनुदान देण्यात येते.
अनुसुचित जाती, जमाती प्रवर्गासाठी स्वतंत्र अनुदान उपलब्ध आहे. यासाठी सदर प्रवर्गाचे प्रमाणपत्र शेतकऱ्यांकडे असणे आवश्यक आहे. या प्रवर्गातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकाऱ्यांनी केले आहे. कृषि विभागामार्फत केंद्र, राज्य पुरस्कृत विविध योजना राबविण्यात येतात. शेतकऱ्यांनी या सर्व योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे.