(रत्नागिरी / प्रतिनिधी)
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातर्फे अनाथ आणि निराधारांना शिधापत्रिका वितरित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याकरिता ३१ डिसेंबरपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा विभागातर्फे केले आहे. अनाथांना वयाच्या २८ वर्षापर्यंत तात्पुरती पिवळी शिधापत्रिका वितरित करून प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत लाभ देण्यात येणार आहे.
यासाठी महिला व बालविकास विभागाने वितरित केलेले अनाथ प्रमाणपत्र किंवा आई, वडील यांचे मृत्यू प्रमाणपत्र यापैकी एक पुरावा, आधारकार्ड, बँक पासबूक, बालगृह, निरीक्षणगृह अनुरक्षणगृह आदी संस्थेच्या अधीक्षकांचे संस्थेत वास्तव्याचे प्रमाणपत्र यापैकी एक पुरावा, शहरी भागात नगरसेवक व ग्रामीण भागात सरपंच, उपसरपंच यांचे रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक आहे.