(मुंबई)
हिंदू धर्मात अधिक महिना विशेष महत्त्वाचा आहे. यंदाच्या अधिक महिन्यात अचानक अनेक ठिकाणी उसाच्या रसाची मागणी वाढली आहे. उसाच्या रसाचा खप अचानक का वाढला? याचे कारण सांगितले जात आहे की , अधिक महिन्यात तुळशीची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होते. विशेषत: अधिक मासाच्या पाचव्या दिवशी तुळशीला उसाचा रस अर्पण केला तर संपत्ती आणि समृद्धी येते, असे शास्त्रात लिहिले आहे. यामुळे अनेक ठिकाणी रस खरेदीसाठी रसवंतीवर गर्दी होत आहे. मुंबईसह अनेक शहरांमध्ये उसाच्या रस अधिक विकला जात आहे.
श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी स्नान करून भगवान शिव आणि भगवान विष्णूची विधिवत पूजा केली जाते. यानंतर उसाचा रस हातात किंवा भांड्यात घेऊन तो तुळशीला अर्पण करावा अशी माहिती यावर्षी सर्वत्र पसरली आहे . त्यामुळे अनेकजण एक ग्लास, दोन ग्लास उसाचा रस पार्सल मागत आहेत. हा रस अर्पण करायचा असल्याने या रसात लिंबू आणि मीठ टाकले जात नाही. श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी उसाचा रस तुळशीला अर्पण करायचा असे सांगण्यात येत असले तरी आता दररोजही तुळशीला रस अर्पण केला जात आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात रसवंती बंद असतात. मात्र यावेळी अचानक उसाचा रस उन्हाळ्यापेक्षा अधिक महिन्यात जास्त विकला जात आहे.