(नवी दिल्ली)
फोर्ब्सने श्रीमंत भारतीयांची यादी जाहीर केली असून अपेक्षेप्रमाणे गौतम अदानी यांनी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळवला आहे. त्यांनी मुकेश अंबानींना मागे टाकून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
शेअर बाजारात कंपनीच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे फाल्गुनी नायर यांनी प्रथमच या यादीत स्थान मिळवले आहे, तर स्टॉक क्रॅशमुळे पेटीएमचे विजय शेखर शर्मा हे भारतातील टॉप १०० मधून बाहेर पडले आहेत.
शेअर्सच्या दमदार कामगिरीच्या जोरावर अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सच्या यादीनुसार, गौतम अदानी यांची संपत्ती जवळपास दुप्पट होऊन $150 अब्ज झाली आहे. त्याच वेळी 2013 पासून देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या पदावर असलेले मुकेश अंबानी 2022 मध्ये $ 88 अब्ज संपत्तीसह मागे पडले आहेत. गेल्या वर्षी त्यांची एकूण संपत्ती $92.7 अब्ज होती. फोर्ब्सच्या यादीनुसार, देशातील 100 सर्वात श्रीमंत लोकांची एकूण संपत्ती $600 अब्जच्या जवळपास आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात $25 अब्जची वाढ झाली आहे.