(मुंबई)
किमान ५०० चौरस फुटांची घरे देऊन सर्वांचे पुनर्वसन धारावीमध्येच करण्याच्या मागणीसाठी धारावीकर पुन्हा एकदा एकवटणार आहेत. येत्या ४ फेब्रुवारी रोजी यासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून यानंतरही मागण्या मान्य न करण्यात आल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा धारावी बचाव समन्वयक समितीने दिला आहे. धारावीतील अपात्र रहिवाशांच्या नावाखाली धारावीचा भूखंड अदानीला आंदण देण्याचा डाव असल्याचे आरोप करीत धारावीकर आक्रमक झाले आहेत. सरसकट धारावीतच आणि ५०० चौरस फुटाची घरे द्यावीत या मागणीसाठी धारावीकरांनी आंदोलन तीव्र केले आहे.
येत्या ४ फेब्रुवारी रोजी धारावीत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी धारावी बचाव समन्वय समितीकडून शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या नेत्यांनाही निमंत्रण देण्यात येणार आहे.
अपात्र रहिवाशांच्या नावाखाली धारावीतील रहिवाशांना मुलुंडमध्ये हलविण्याचा आणि धारावीचा भूखंड अदानीला आंदण देण्याचा डाव आखण्यात येत असल्याचा आरोप धारावीकरांनी केला आहे. मुलुंडमध्ये अपात्र धारावीकरांना घरे देण्यासाठी धारावी पुनर्वसन प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडने (डीआरपीपीएल) मुंबई महानगरपालिकेला पत्र पाठवले आहे. या पत्राद्वारे मुलुंडमधील ६४ एकर जागेची मागणी पालिकेकडे केली आहे, तर दुसरीकडे धारावीकरांची ५०० चौरस फुटाच्या घराची मागणी असताना त्यांना ३५० चौरस फुटाचे घर देण्याचे डीआरपीपीएलने जाहीर केले आहे.
यावर धारावीकर संतापले असून त्यांनी आता आंदोलनाची हाक दिली आहे. धारावीत नुकत्याच आयोजित बैठकीत ४ फेब्रुवारीला जाहीर सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती धारावी बचाव आंदोलनाचे समनव्यक बाबुराव माने यांनी दिली. धारावी पुनर्विकासाचा पहिला शासन निर्णय ४ फेब्रुवारी २००४ रोजी काढण्यात आला होता. त्याला २० वर्षे पूर्ण होत आहे, याचे औचित्य साधत धारावीकरांच्या न्याय मागण्यासाठी ४ फेब्रुवारीला ९० फूट रोड येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आल्याचे धारावी बचाव आंदोलनाचे समन्वयक राजू कोरडे यांनी सांगितले.