(नवी दिल्ली)
अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाची अवस्था बिकट झाली आहे. गेल्या वर्षभरात ज्या वेगाने गौतम अदानी यांच्या संपत्तीत वाढ झाली, त्याच वेगाने त्यांच्या संपत्तीत घसरण झाली आहे. हिंडेनबर्गने आपल्या अहवालात गौतम अदानी यांच्यावर अकाउंटिंग फ्रॉड, शेअर्सच्या किंमतीत फेरफार केल्याचे आरोप केला. तेव्हापासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण सुरू असून, जवळपास ८५ टक्क्यांपर्यंत त्यांचे शेअर्स घसरले आहेत. यासोबतच देशातील दिग्गज सरकारी बँकादेखील दिवाळखोरीत जाण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. त्यानंतर घसरणीचा धडाका सुरू राहिल्याने अदानी समुहाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्याचा फटका सार्वजनिक कंपनी एलआयसीला तर बसतच आहे. शिवाय देशातील दिग्गज सरकारी बँकांनाही फार मोठी झळ बसण्याची शक्यता आहे. अर्थात, या सरकारी बँका दिवाळखोरीत निघण्याचा धोका निर्माण झाला आहे, असे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. कारण एलआयसीसोबतच दिग्गज सरकारी बँकांच्या शेअर्समध्येही घसरण होत आहे.
गौतम अदानी यांच्या कंपनीला झालेल्या तोट्याचा परिणाम एसबीआयवरही झाला आहे. अदानींनी एसबीआयकडून सर्वाधिक कर्ज घेतले आहे. अदानीवरील कर्जाचा बोजा पाहता एसबीआयच्या गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जर अदानी कर्जाची परतफेड करू शकले नाहीत, तर बँकेचे मोठे नुकसान होईल, अशी भीती गुंतवणूकदारांना वाटत आहे. त्यामुळे एसबीआयच्या शेअर्समध्ये मोठी विक्री झाली. एसबीआयचे समभाग १४ टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. एसबीआयचा शेअर २३ जानेवारीला ६०४.६० रुपये होता, तो २३ फेब्रुवारीला ५२१ रुपयांवर घसरला आहे.
यासोबतच इंडियन ओव्हरसीज बँकेचे शेअर १७ टक्क्यांनी घसरले आहेत. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे शेअर्स एका महिन्यात १६.४७ टक्क्यांपर्यंत घसरले. पंजाब आणि सिंध बँकेचे शेअर्स एका महिन्यात १५.६ टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. याशिवाय बँक ऑफ बडोदाचे एका महिन्यात २ टक्क्यांनी शेअर्स घसरले. म्हणजेच हिंडेनबर्ग अहवालामुळे केवळ अदानीच नाही तर त्याच्याशी संबंधित लोकांनाही मोठा धक्का बसला आहे.