(गुवाहाटी)
अटीतटीच्या लढतीत पंजाबने राजस्थानचा पाच विकेटने पराभव केला. शिखर धवनच्या अर्धशतकानंतर नॅथन एलिस याने केलेल्या भेदक मा-याच्या जोरावर पंजाबने राजस्थानचा पराभव केला. पंजाबने दिलेल्या १९८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या संघाने १९२ धावांपर्यंत मजल मारली. शिमरोन हेटमायर आणि जुरेल यांनी विजयासाठी अखेरपर्यंत प्रयत्न केले, पण सॅम करन याने भेदक मारा करत पंजाबला विजय मिळवून दिला. पंजाब आणि राजस्थान या दोन्ही संघांनी आयपीएलच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवलेला आहे. त्यामुळं आता आयपीएलमध्ये सलग दुसरा विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ जोरदार प्रयत्न करताना दिसतील.
१९८ धावांचा पाठलाग करताना राजस्थान संघाने सलामीची जोडी बदलली. विस्फोटक फलंदाज जोस बटलर याला सलामीला पाठवले नाही. त्याजागी आर. अश्विन सलामीला उतरला होता. अश्विन आणि यशस्वी जायस्वाल यांनी सलामी दिली. पण राजस्थानचा हा डाव यशस्वी ठरला नाही. अश्विनला एकही धाव काढता आली नाही. अश्विन चार चेंडू खेळून शून्यावर बाद झाला. त्याशिवाय यशस्वी जायस्वाल याने आठ चेंडूत ११ धावा काढल्या तर तिस-या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या बटलर याने १९ धावांचे योगदान दिले.
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. संजू सॅमसन याने २५ चेंडूत ४२ धावांची खेळी केली. संजूने या खेळीदरम्यान एक षटकार आणि पाच चौकार लगावले. जोस बटलर आणि यशस्वी झटपट बाद झाल्यानंतर संजू सॅमसन याने धावसंख्या वाढवण्याची जबाबदारी पार पाडली. पण एलिसच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात संजू बाद झाला.
शिमरोन हेटमायर याने केलेल्या जबरदस्त फलंदाजीमुळे सामना अखेरच्या चेंडूपर्यंत गेला. हेटमायर याने जुरेलसोबत राजस्थानच्या विजयाच्या आशा उंचावल्या होत्या. पण हेटमायर बाद झाल्यानंतर पंजाबने सामन्यात पुनरागमन केले. शिमरोन हेटमायर याने १८ चेंडूत ३६ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने तीन षटकार आणि एक चौकार लगावला. मोक्याच्या क्षणी जुरेल आणि हेटमायर यांनी अर्धशतकी भागिदारी केली. पण संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. जुरेल याने १५ चेंडूत ३२ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने दोन षटकार आणि तीन चौकार लगावले.
नॅथन एलिसचा अफलातून स्पेल
पंजाबचा वेगवान गोलंदाज नॅथन एलिस याने जबरदस्त गोलंदाजी केली. एलिसच्या गोलंदाजीपुढे राजस्थानच्या दिग्गज फलंदाजांनी गुडघे टेकले. एलिस याने चार षटकात अवघ्या ३० धावा खर्च केल्या. एलिस याने चार विकेट घेत पंजाबच्या विजयाच्या आशा उंचावल्या. एलिसने भन्नाट फॉर्मात असलेल्या जोस बटलरचा अडथळा दूर केला. एलिसने जोस बटलरशिवाय संजू सॅमसन, देवदत्त पडिक्कल आणि रियान पराग यांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याशिवय अर्शदीप सिंह यानेही भेदक मारा केला. अर्शदीप याने दोन विकेट घेतल्या.