(रत्नागिरी)
सावकारी कर्ज देऊन त्यावर भरमसाठ व्याज दर आकारून सर्वसामान्यांची लुबाडणूक करणाऱ्या नीलेश कीर याच्या मोबाइलमध्ये काही आक्षेपार्ह ‘व्हिडीओ क्लिप’ आढळल्या आहेत. या क्लिपचा कर्जदारांशी काही संबंध आहे का, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
रत्नागिरी शहरातील मिऱ्या येथील नीलेश कीर याला बेकायदेशीर सावकारीप्रकरणी अटक केली आहे. त्याच्याविरोधात आतापर्यंत आठ कर्जदारांनी तक्रार दिली आहे. त्यांना पहिल्या गुन्ह्यात साक्षीदार म्हणून नोंदविले आहे.
अल्प कर्जाच्या बदल्यात नीलेश याने बंदुकीच्या धाकावर भरमसाठ व्याजाने कर्जाची वसुली केली होती. या सावकारी धंद्यात त्याने अनेकांची मालमत्ता हडप केली आहे. करबुडे येथील जयवंत कळंबटे यांची साडेसात एकर जागा केवळ २० हजारांच्या बदल्यात घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या जमीन खरेदीसाठी स्टॅम्प ड्युटी म्हणून भरलेली साडेपाच लाखांची मागणीही त्याने केली होती. त्याच्या या त्रासाला कंटाळून कळंबटे यांनी शहर पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी नीलेश याची कसून चौकशी सुरू केली असून, त्याचा मोबाइलही जप्त केला आहे. या मोबाइलमध्ये कर्जदारांशी ज्या भाषेत तो दमदाटी, शिविगाळ करत होता. त्याच्या ‘ऑडिओ क्लिप’ त्यानेच रेकॉर्ड करून ठेवलेल्या सापडल्या आहेत. त्याचबरोबर मोबाइलमध्ये काही आक्षेपार्ह ‘व्हिडीओ क्लिप’ही सापडल्या आहेत. याचा संबंध गुन्ह्याशी आहे का, याचा शोध सुरू आहे. त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी मिळाल्याने कसून चौकशी सुरू आहे.
कागदपत्रांच्या फोटोकॉपी आढळल्या…
नीलेशने कर्जदारांची सर्व कागदपत्रे केली गायब
बेकायदेशीर सावकारीप्रकरणी गुन्हा दाखल होताच नीलेशने कर्जदारांची सर्व कागदपत्रे गायब केली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता कागदपत्रे गहाळ झाल्याचेही सांगितले होते. मात्र, त्याच्याकडील मोबाइलमध्ये काही कागदपत्रांच्या फोटोकॉपी पोलिसांना आढळल्या आहेत.