महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप प्रत्यारोप होत असताना राष्ट्रवादीच्या नेत्यानं मोठं वक्तव्य केलं आहे. अजित पवारांसारखा अभ्यासू माणूस राजकारणात नाही. त्यामुळं अजित पवार मुख्यमंत्री होणारच. हे अमित शहा यांनी देखील मान्य केलं असून त्यांच्याही महाराष्ट्र वाऱ्या वाढल्या आहेत. त्यामुळे अजित पवार मुख्यमंत्री होणारच.. वेट अँड वॉच, असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे. ते बीडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मिटकरी म्हणाले की, राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की, पक्षाचा नेता मुख्यमंत्री बनावा. जसं हे राज्य व्हावं, ही तर श्रींची इच्छा, असे इतिहासामध्ये आम्ही वाक्य ऐकले, बखरीमध्ये वाचले. तत्कालीन रयतेला तसं वाटलं होतं. आता तो काळ नाही राहिला, पण आता लोकशाहीमध्ये प्रशासनावर पकड असणारा अभ्यासू व्यक्तीमत्व असणारा एखादा व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असावा. ही भूमिका अन् भावना प्रत्येकाची आहे, माझी सुद्धा भावना कार्यकर्ता म्हणून अशीच आहे, असंही यावेळी मिटकरी म्हणाले.
भविष्यात महाराष्ट्राचे नेतृत्व अजित पवार करतील याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही आणि त्यांनी ते करावं, असं माझ मत आहे. त्यांच्या सारखा नेता महाराष्ट्राचा राजकारण सापडणार नाही. हे अमित शहा यांनीही मान्य केले आहे, असा गौफ्यस्फोट देखील यावेळी आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. कोणत्याही माध्यमातून महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात येईल,असा विश्वास आणि मोठं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे.