(मुंबई)
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार हे नाव प्रचंड चर्चेत आहे. राज्याच्या राजकारणात शिवसेनेच्या बंडानंतर दूसरा मोठा भूकंप झाला तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी पक्षाविरूद्ध बंड पुकारत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. एवढंच नाही तर आपल्यासोबत ४० आमदार आणि काही खासदार घेवून अजितदादा बाहेर पडले. उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली. पवारांसोबत राष्ट्रवादीच्या आणखी ९ आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.
अजित पवारांनी शिंदे – फडणवीस सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यान महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळचं वळण मिळालं. मात्र अजितदादा नाराज होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही त्यांनी त्यांची नाराजी विविध कृतीतून दाखवून दिली आहे. पण यावेळी दादा यशस्वी झाल्याचं पाहायला मिळत आहे. याआधी अजित पवार केव्हा आणि कोणत्या कारणाने नाराज झाले होते याबद्दल जाणून घेऊया
1. अजित दादा नाराज अशी चर्चा पहिल्यांदा सुरू झाली ती 2004 साली.
निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीनं 71 जागा जिंकल्या आणि काँग्रेसनं 69. राज्यात आघाडी सरकार अस्तित्वात येत होतं, जास्त आमदार असल्यानं राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होईल अशीच चर्चा होती आणि या चर्चेत आघाडीवरचं नाव होतं,अजित पवारांचं. पण शरद पवारांनी महत्त्वाची मंत्रीपदे राष्ट्रवादीकडे घेतली आणि मुख्यमंत्रिपद काँग्रेसला दिलं. अजित पवारांचा मुख्यमंत्री होण्याची संधी चान्स हुकली आणि अजित पवार शरद पवारांवर नाराज असल्याच्या बातम्या आल्या, पण त्या काही दिवस चालू होत्या.
2. दुसरा प्रसंग आहे 2009 चा
निवडणुकीनंतर काँग्रेसच्या जागा आल्या 82 आणि राष्ट्रवादीच्या 62. जास्त जागा निवडून आलेल्या काँग्रेसनं मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितला. राष्ट्रवादीच्या वाट्याला पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपद आलं. राष्ट्रवादीची मराठाकेंद्री इमेज मोडायला आणि राज्यातल्या ओबीसी मतांची मोट बांधायला शरद पवारांनी छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्री केलं. माध्यमांच्या वृत्तानुसार अजित पवारांनी नाराजीमुळं बंडाचा इशारा दिला आणि एक दिवस नॉट रिचेबल झाले, मात्र शरद पवारांनी त्यांना काही महिन्यात उपमुख्यमंत्री करण्याचं आश्वासन दिलं.
3. अजित पवारांनी पुन्हा एकदा 2012 मध्ये नाराजीच कार्ड खेळलं
1999 ते 2009 या काळात अजित पवार राज्याचे जलसंपदा मंत्री असताना राज्यात सिंचन घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा केली, तर विरोधकांनीही अजित पवारांना चांगलंच घेरलं. त्यानंतर 25 सप्टेंबरला अजित पवारांनी तडकाफडकी उपमुख्यमंत्रीपद आणि इतर पदांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीच्या सगळ्या मंत्र्यांनीही आपापले राजीनामे प्रदेशाध्यक्षांकडे सोपवले. स्वतः शरद पवारांना पुढे येऊन सरकारला धोका नसल्याचं स्पष्टीकरण द्यावं लागलं. पण या सगळ्यामुळे शरद पवार विरुद्ध अजित पवार असं चित्र उभं राहिलं. काँग्रेस हायकमांडच्या आदेशानुसार पृथ्वीराज चव्हाणांनी अजित पवारांचा राजीनामा स्वीकारला. त्यानंतर डिसेंबर 2012 मध्ये अजित पवार पुन्हा मंत्रीमंडळात आले आणि त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचाच कारभार सांभाळला. साहजिकच अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चा विरल्या.
4. चौथा प्रसंग आला, 2019 मध्ये
2019 च्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली होती आणि त्याचवेळी राज्यातलं राजकारण ईडीच्या चौकशीमुळं तापलेलं होत. ईडीनं महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात अजित पवारांसह 70 जणांवर गुन्हा दाखल केला होता. यात शरद पवारांचंही नाव होत. शरद पवारांनी आपण स्वतः ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहणार असल्याची घोषणा केली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज्यात आंदोलनं केली, पक्षाचे सगळे नेते एकत्र आले, ईडीच्या अधिकाऱ्यांना शरद पवारांना चौकशीसाठी येण्याची काहीच गरज नाही असं स्पष्टीकरण द्यावं लागलं. मात्र हे सगळं चर्चेत असतानाच अजित पवारांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा पाठवला, त्यांनी पत्रकार परिषद घेत आपल्यामुळं शरद पवारांवर गुन्हा दाखल झाल्यानं व्यथित झालो आणि राजीनामा दिला असं सांगितलं. त्यांच्या राजीनाम्यामुळं बातम्यांचा फोकस ईडी विरोधातल्या राष्ट्रवादीच्या आंदोलनांवरुन हलला आणि पक्षाला सहानुभूती मिळण्याऐवजी अजित पवारांच्या नाराजीची चर्चा रंगली. शरद पवारांच्या एका निर्णयामुळं ईडीची चौकशी हा राष्ट्रवादीसाठी फुलटॉस ठरला होता, मात्र अजित पवारांच्या राजीनाम्यानं या सगळ्याची हवाच काढून घेतली. स्वतः शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं की, ‘अजित पवारांनी आपल्या कुटुंबियांना असं सांगितलं की, राजकारणाची पातळी घसरली आहे, आपण राजकारण सोडून शेती किंवा उद्योग करु. मात्र काही दिवस उलटले आणि अजित पवार पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारात सक्रिय झाले. त्यानंतर बारामतीमधून आमदार म्हणून निवडूनही आले.
5. पाचवा आणि गाजलेला प्रसंग पहाटेचा शपथविधी
2019 च्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात झालेलं सत्तानाट्य सगळ्यांनाच परिचित आहे. जेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात किमान समान कार्यक्रम आणि पदवाटपाच्या चर्चा सुरु होत्या, तेव्हा एका बैठकीतून अजित पवार तडकाफडकी निघाले आणि माध्यमांशी बोलताना ‘नो कमेंट्स, मी बारामतीला चाललोय.’ असं विधान केलं. अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा तिढा आणि अजित पवारांना डावललं गेल्यामुळं ते नाराज असल्याच्या चर्चा त्यावेळी रंगल्या. पण या घटनेला 10 दिवसही उलटले नव्हते आणि 23 नोव्हेंबर 2019 च्या सकाळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची, तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीचे काही आमदारही नॉट रिचेबल झाले आणि अजितदादांनी राष्ट्रवादी फोडल्याच्या बातम्यांना उधाण आलं. शरद पवारांनी अजितदादांसोबत असलेल्या आमदारांना पुन्हा आपल्याकडे वळवण्यात यश मिळवलं. या सगळ्याचा परिणाम म्हणून हे सरकार बहुमत चाचणीला सामोरं जाण्याआधीच कोसळलं आणि देवेंद्र फडणवीस, अजित पवार या दोघांनीही पदाचा राजीनामा दिला.
6. सहावा प्रसंग घडला एप्रिल 2023 मध्ये
भाजप-राष्ट्रवादी युतीच्या चर्चा रंगल्या होत्या, पण शरद पवारांनी या चर्चांचं खंडन केलं, पण कुटुंबातल्या काही सदस्यांवर दबाव आहे, वैयक्तिक निर्णय घेण्यासाठी ते स्वतंत्र आहेत, असं वक्तव्य शरद पवारांनी केल्याचं संजय राऊतांनी आपल्या लेखात सांगितलं. त्यातच अजित पवार यांनीच अचानक आपले नियोजित दौरे रद्द केले, त्यांचा फोनही नॉट रिचेबल असल्याचं सांगितलं गेलं. अजित पवार रात्री दिल्लीला जाऊन अमित शहांना भेटल्याचा बातम्या सूत्रांच्या हवाल्याने दिल्या जाऊ लागल्या. मात्र दुसऱ्याच दिवशी अजित पवार पुण्यात एका ज्वेलर्सच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि राष्ट्रवादी फुटणार का ? या प्रश्नाला स्वल्पविराम मिळाला.राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी 10 जूनला शरद पवारांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदाची संधी दिली. महाराष्ट्राची जवाबदारीही सुप्रिया सुळेंना देण्यात आली. तेव्हापासून पुन्हा एकदा अजित दादा नाराज असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या. आणि अचानक 2 जुलैला अजित दादांनी 8 आमदारांसह मंत्रिपदाची शपथ घेऊन सगळ्यांना धक्का दिला. अजित दादांच्या सातव्या प्रयत्नाला अखेर यश आलं. पण हे यश लाँग टर्म टिकणार की नाही हे येणारा काळच ठरवेल.