(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी-नागपूर चौपदरीकरणाचे काम जोरात सुरू आहे. या मुख्य रस्त्यावर हातखंबा (सोहम फिटनेस) येथील वादग्रस्त उभारलेल्या टपरीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून ( ६ जून २०२३) कारवाई करण्यात आली आहे. वादग्रस्त टपरी प्रकरण चांगलेच गाजले होते. अनेक बातम्या प्रसिध्द करण्यात आल्या होत्या. मात्र आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून वादग्रस्त टपरी हटवून कारवाई केली आहे. अनधिकृत उभारलेल्या टपरी संदर्भात मूळ जमीन मालकांनी प्रशासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार करून सुद्धा “सरकारी काम वर्षभर थांब” या म्हणीप्रमाणे स्थिती निर्माण झाली होती. परंतु आता कारवाई केल्याने जमीन मालकांच्या मागणीला यश आले आहे.
संबंधीत टपरीधारक ग्रामपंचायत माजी सदस्या आणि तंटामुक्त समितीच्या सदस्या आहेत. बेकायदेशीर पद्धतीने रस्त्यात थाटलेल्या अनधिकृत टपऱ्या घरासमोर व अधिग्रहण केलेल्या जमिनीत असल्याने मूळ जमिनमालकांचा कडाडून विरोध सुरू होता. या प्रकरणाबाबत स्थानिक तंटामुक्त समिती ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पत्रव्यवहार करून वारंवार पाठपुरावें करण्यात येत होते. दुसऱ्या बाजूने रत्नागिरी-नागपूर चौपदरीकरणाचे काम चालू झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून प्रत्येक अनधिकृत गाळे, बांधकामे, टपऱ्या अशा सरकारी जागेत असणाऱ्या सर्व अस्थापांनांना नोटीस दिलेल्या आहेत. याप्रमाणे वादग्रस्त टपरीधारकांना देखील २२ मे २०२३ रोजी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र या नोटीशीला देखील न जुमानता टपरी आहे त्या स्थितीत उभी होती. यापूर्वी ही अशाच पद्धतीने टपरीधारकाचा मुजोरपणा सुरू असल्याचे चित्र होते. त्यामुळे नोटीस देऊन अकरा दिवस उलटूनही टपरी हटविली जात नसल्याने अखेर मंगळवारी (दिनांक ६ जून २०२३) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून वादग्रस्त टपरीबरोबर तिथेच असणाऱ्या एका टपरीवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच या जागेवर पुन्हा टपऱ्या उभ्या केल्या तर पुन्हा कठोर कारवाई केली जाईल अशा सूचना प्राधिकरण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. यासोबत या ठिकाणी जे अनधिकृत बांधकाम आहे. त्याना संबधित नोटीस देण्यात आली असून काही दिवसांत सदर अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
वादग्रस्त टपरीवर कारवाई केल्याने जमीन मालकांच्या मागणीला यश आले असून कारवाईबाबत समाधान व्यक्त केले आहे. तसेच ग्रामपंचायतीने सदर टपरी चालकांना तीन अटींचे पालन करण्यास सांगितले होते. व परवानगी (ना हरकत दाखला) दिली होती. या अटींचा भंग झाल्याचे निदर्शनास येताच वादग्रस्त अनधिकृत टपरीवर स्वतः ग्रामपंचायतीने तत्परता दाखवून कारवाई करणे अपेक्षित होते. पण तसे ग्रामस्तरावर झाले नाही. त्यामुळे आता यापुढे ग्रामपंचायतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या हद्दीत परवाने देताना विचार करायला हवा अशी प्रतिक्रिया अमोल कांबळे ( जमीनधारक) यांनी यावेळी दिली आहे.
तंटा घडवल्याप्रकरणी समितीच्या सदस्यांवर प्रांताधिकारी कारवाई करणार का?
काही वर्षांपूर्वी मूळ मालकांची जमीन सरकारने रस्त्यासाठी अधिग्रहण केलेली आहे. याच जमिनीच्या समोर अनधिकृत टपरी राजरोसपणे थाटण्यात आली होती. संबंधीत टपरीधारक ग्रामपंचायत माजी सदस्या आणि तंटामुक्त समितीच्या सदस्या असल्यामुळें आमचे कोणीच काही करू शकत नाही या आविर्भावात वागत असल्याचे दिसून येत होते. ग्रामीण भागात होणारे किरकोळ वाद टाळण्यासाठी तसेच गावात झालेले वाद गावातच मिटवण्यासाठी शासनाने तंटामुक्त गाव समित्या गठित केल्या आहेत. काही वर्षे या समितीने चांगल्या प्रकारे काम केले. मात्र सद्या हातखंबा तंटामुक्त समितीचे सदस्य स्वतः वाद घडविण्यात अग्रेसर असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. जर तंटामुक्त समितीचे सदस्य तंटा निर्माण करत असतील तर गाव तंटामुक्त कसा होणार? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. त्यामुळे वाद निर्माण करणाऱ्या तंटामुक्त समितीच्या महिला सदस्यांवर प्रांताधिकाऱ्यांकडून कोणती कारवाई केली जाते, हे पाहणे औत्सक्याचे ठरणार आहे.