(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरीकरांच्या एस. टी. बस स्थानकाबाबतच्या आशा आता पल्लवित होणार आहेत. रत्नागिरी एसटी बसस्थानकासाठी नव्या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आह़े. मागील कंत्राटदाराने एस. टी. बस स्थानकाकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांसह सर्वच प्रवाशांना बराच त्रास सहन करावा लागला आहे. अनेक उपोषणे, आंदोलने, मोर्चे निघाले मात्र यावर तोडगा निघत नव्हता.
माजी परिवहन मंत्री अनिल परब यांनी हे बसस्थानक लवकरच पूर्ण होईल असे आश्वासन दिले होत़े. मात्र याबाबत प्रत्यक्षात काहीच झाले नाही. मंत्र्यांच्या आदेशालाही ठेकेदाराने न जुमानता काम अर्धवट ठेवले होते. त्यामुळे जनता त्रस्त होती.
सध्या एस् टी ची वाहतूक ही रहाटाघर बसस्थानकातून होत आहे. त्यामुळे प्रवासी बस बसस्थासमोरील सारस्वत बँकेच्या समोरील स्टॉप वर उभे राहून गाडीची वाट पाहत असतात. परिणामी या ठिकाणी गाड्या थांबल्यानंतर तेथे प्रचंड गर्दी होते. वाहतुकीची कोंडीही होते. जवळच काही शाळा असल्यामुळे मुलांचीही या ठिकाणी गर्दी वाढते. सायंकाळच्या वेळी कामावरून सुटणारे कामगार, शासकीय कर्मचारी या ठिकाणी बसची वाट पाहत असतात. या साऱ्याचा विचार करून एस. टी बस स्थानक पूर्णत्वास जाण्यासाठी एस. टी प्रशसनाकडून प्रयत्न करण्यात येत होते.
अखेर त्यांच्या मागणीला यश आले असून या बस स्थानकासाठी नवीन कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता लवकरच एस. टी बस स्थानक पूर्ण होऊन प्रवासी, वाहन चालक, विद्यार्थ्याची गर्दीपासून लवकर सुटका होणार आहे असे परिवहन कार्यालय कडून सांगण्यात आले आहे.