(दापोली / प्रतिनिधी)
राज्यात शिंदे-पडणवीस सरकार स्थापन होताच आमदार योगेश कदम यांनी पूर्वीपासून पाठपुरावा केलेल्या दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या रखडलेल्या कामाला प्रशासकीय पातळीवरुन गती मिळाली आहे. गेली अनेक वर्षे १०० खाटांची मंजुरी मिळाली आहे, पण या दर्जोन्नतीच्या कामाकडे शासनाकडून दुर्लक्ष झाले होते. या कामासाठी आता निविदा प्रसिध्द झाल्याने लवकरच हे काम मार्गी लागेल, हे आता स्पष्ट झाले आहे.
दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या श्रेणीवर्धन कामाची निविदा प्रसिध्द झाल्याने दापोलीकरांची अनेक वर्षापासूनची रुग्णालयाची प्रलंबित मागणी आता पूर्ण होणार आहे. दापोली शहरात असलेल्या ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे १०० खाटांच्या रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यासाठीच्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी १३ कोटी ४० लाख ४२ हजार ५१७ रुपयांची निविदा सूचना प्रसिध्द झाली आहे.
दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालय ५० खाटांचे असून त्याचे ५०० खाटांमध्ये श्रेणीवर्धन करण्याचा शासन आदेश १० वर्षापूर्वीच निघाला होता. दापोलीबरोबर असे श्रेणीवर्धन करण्याचे शासन आदेश झालेल्या राज्यातील इतर रुग्णालयांच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊनही रुग्णालये ५ वर्षापासून रुग्णांना सेवा देत आहेत, मात्र २०१९ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत विजयी झाल्यावर आमदार योगेश कदम यांनी या कामासाठी पाठपुरावा करत शासनाकडून निधी मंजूर करुन घेतला. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वाढीव इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रकासाठी वेळ लागला होता, अखेर हे काम पूर्ण होऊन निविदा प्रसिध्द केली आहे .