(देवरुख)
देवरुख-मार्लेश्वर रस्त्याबाबत आज मार्लेश्वर तिठा येथे झालेले जाहीर उपोषण अखेर यशस्वी ठरले. खड्डेमय रस्ता त्वरित दुरुस्त करून द्यावा अन्यथा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी आमरण उपोषण करू अशी जाहीर घोषणा केल्यानंतर बांधकाम उपविभाग, देवरुख यांचेकडून योग्य ती दखल घेण्यात आली नाही. केवळ पत्रव्यवहारावर समाधानी न राहता आम्ही कृती करून दाखवली आणि सर्वांच्या सहकार्याने यशस्वी ठरलो. सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून उपोषण सुरू केले. आणि उपोषणाला वाढता लोकसहभाग आणि पाठींबा पाहून बांधकाम अधिकारी धावतपळत आले. दुपारी अवघ्या 3-4 तासांनंतर श्रीमती इंगवले मॅडम यांनी दि. 19 एप्रिल पासून काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले आणि उपोषण समाप्त करण्याची विनंती केली. त्यांचे लेखी आश्वासनानंतर उपोषणात सहभागी सर्वांशी विचारविनिमय करून मगच उपोषण समाप्त करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे हे निर्भेळ यश मी समस्त उपोषणकर्त्यांना अर्पण करतो अशी विनम्र प्रतिक्रिया भाजप युवा मोर्चा रत्नागिरी (दक्षिण) चे जिल्हा उपाध्यक्ष तथा युवा नेते श्री. रुपेश कदम यांनी व्यक्त केली.
तसेच हे उपोषण जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी होते. त्यामुळे या आश्वासनाची पूर्तता होईपर्यंत म्हणजेच कामाला सुरुवात होईपर्यंत आम्ही प्रशासनाला सहकार्य करू पण पुन्हा अशी वेळ आमच्यावर येणार नाही अशी खबरदारी प्रशासनाने घेणे अत्यंत आवश्यक आहे असा गर्भित इशाराही याप्रसंगी रुपेश कदम यांनी दिला.
या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव, संघटन सरचिटणीस अमित केतकर, देवरुख नगराध्यक्षा सौ. मृणालताई शेट्ये, देवरुख शहराध्यक्ष आणि माजी उपनगराध्यक्ष सुशांत मुळ्ये, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष अभिजीत शेट्ये, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष अनुराग कोचीरकर, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, मनोहर गुरव, रविंद्र माईण, व्हावळ गुरुजी, यशवंत गोपाळ, तसेच दशक्रोशीतील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
तसेच विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांनीही सहकार्य केले. त्यामुळे आम्ही योग्य रीतीने आंदोलन केले आहे असे म्हणु शकतो. एकूण 300 पेक्षा अधिक लोक यावेळी उपोषणासाठी बसले होते. त्यामुळे सर्वांचेच मनःपूर्वक आभार मानून उपोषण समाप्त झाल्याचे श्री कदम यांनी जाहीर केले.