(पुणे)
राज्यातील सर्वाधिक मोठे आणि सुरक्षित म्हणून ख्याती असलेल्या पुण्यातील येरवडा कारागृहातून हत्येच्या प्रकरणातील एक अट्टल आरोपी फरार झाल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे येरवडा कारागृह प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा पुढे आला आहे.
येरवडा कारागृह राज्यातील सर्वांत मोठे कारागृह आहे. या ठिकाणी कैद्यांमधील हाणामारीच्या घटना सातत्याने होत असतात. कारागृहातून अनेक गैरकारभार देखील सातत्याने पुढे येत असतात. अशीच एक घटना सोमवारी उघडकीस आली. येरवडा कारागृहातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन खुनाच्या घटनेतील अट्टल गुन्हेगार फरार झाला आहे.
आशिष जाधव असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २००८ मध्ये आशिष जाधवने वारजे माळवाडी येथील एका व्यक्तीचा खून केला होता. त्या प्रकरणी तो येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. आशीष जाधव याचे शिक्षा भोगत असतांना चांगले वर्तन होते. आरोपी फरार झाल्याचे कळल्यावर त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. तो पळून गेल्यानंतर त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. वर्तनातील सुधार पाहून त्याला रेशन विभागात काम देण्यात आले होते. सोमवारी दुपारी कैद्यांची मोजणी करण्यात आली असता, त्यात आशिष आढळला नाही. त्यामुळे येरवडा कारागृह प्रशासनाची पळापळ झाली.