(अंबिकापूर)
लव्ह जिहाद, सक्तीचे धर्मांतर, धर्मांतरामुळे राष्ट्रीय सुरक्षेला उत्पन्न झालेला धोका तसेच समान नागरी कायदा या मुद्द्यांवर संपूर्ण भारतभर वैचारिक आणि सामाजिक मंथन सुरू असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे.
अखंड भारतातील सर्व व्यक्तींचा गेल्या 40 हजार वर्षांपूर्वीपासून DNA एकसमान आहे आणि हे विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध झाले असल्याचे वक्तव्य डॉ. मोहन भागवत यांनी केले आहे. छत्तीसगडमधील अंबिकापूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमात बोलताना डॉ. मोहन भागवत यांनी देशातल्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. डॉ. भागवत म्हणाले, की आज आपल्याला आपण कितीही विभक्त असल्याचे मानत असलो, तरी विज्ञानाच्या कसोटीवर आपण एकच आहोत हे सिद्ध झाले आहे.
#WATCH सबके पूर्वज समान हैं, 40,000 वर्ष पहले से जो भारत था, काबुल के पश्चिम से छिंदविन नदी की पूर्व तक और चीन की तरफ की ढलान से श्रीलंका के दक्षिण तक जो मानव समूह आज है उनका DNA 40,000 वर्षों से समान है और तबसे हमारे पूर्वज समान हैं: RSS प्रमुख मोहन भागवत pic.twitter.com/Sqnm5ocUFT
— ANI_HindiNews (@AHindinews) November 15, 2022
काबूलच्या पश्चिमेपासून ते छिंदविन नदीच्या पूर्वेपर्यंत आणि सध्या चीनच्या ताब्यात असलेल्या तिबेट पासून ते दक्षिणेत श्रीलंकेपर्यंत जो मानव समूह सध्या विद्यमान आहे, त्या मानव समूहाचा DNA किमान गेल्या 40,000 वर्षांपासून समान आहे. हे विज्ञानाने सिद्ध केले आहे. मग भले गेल्या 40,000 वर्षांमध्ये परिस्थिती भिन्नभिन्न बनल्यामुळे आपण वेगवेगळ्या भूमीमध्ये जाऊन राहत असू, आपली पूजा पद्धती, खानपान पद्धती भौगोलिक परिस्थितीनुसार वेगळी झाली असेल, आपल्यात त्या अर्थाने विभिन्नत्व आले असेल, तरी देखील विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की आपला डीएनए हा समान आहे. विज्ञानाच्या कसोटीवर हे सिद्ध झाल्यामुळे आपण कितीही नाकारले तरी आपल्यातले एकत्व हे मिटणारे नाही. आपल्या सगळ्यांचे पूर्वज हे समानच आहेत.
देशातील काही ठराविक घटक समाजामध्ये धार्मिक आधारावर विभिन्नत्वाची भावना रुजवत असताना तसेच तेढ निर्माण करत असतानाच सरसंघचालकांनी उल्लेख केलेले वक्तव्य करणे याला विशेष महत्त्व आहे. संपूर्ण भारतभर आज समान नागरी कायदा, लव्ह जिहाद, सक्तीचे धर्मांतर आणि त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला उत्पन्न होणारा धोका या मुद्द्यावर मंथन सुरू आहे. सुप्रीम कोर्टाने देखील सक्तीच्या धर्मांतराच्या मुद्द्याची दखल घेऊन केंद्र सरकारकडे यावर कठोर उपाय योजना काय करणार?, अशी विचारणा केली आहे. या पार्श्वभूमीवर सरसंघचालकांनी देशातील जनतेच्या ऐक्यावर विज्ञाननिष्ठ पद्धतीने केलेले वक्तव्य महत्वपूर्ण मानले जात आहे.