(लांजा / प्रतिनिधी)
नांदेड मधील बोनडार गावात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली म्हणून अक्षय भालेराव या वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या केली. दुसरी घटना हातगाव तालुक्यातील मौ. वाळकी (खु) येथे मातंग समाज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करीत असतात. मौ. वाळकी या गावात बौध्द समाज राहण्यास नसतानाही, तेथील मातंग समाज का साजरी करतोय ? ही बाब तेथील जातीयवादी मंडळीस खटकत असल्याने जमावाने वस्तीवर सामुहिक हल्ला केला. या दोन्हीं घटनांना निषेध व्यक्त केला आहे. या दोन्ही घटनेच्या जातीवादी मानसिकतेच्या निर्दयी नराधमांचा कायम स्वरुपी बंदोबस्त करा, अशी मागणी शुक्रवारी ( दिनांक ९ जून २०२३) वंचित बहुजन आघाडी लांजा तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनद्वारे केली आहे.
सदर निवेदनात म्हटलेय की, अक्षय भालेराव हा वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकारी असलेल्या बौद्ध युवकाची नांदेड जिल्हयातील बाँढार या गावी १ जुन रोजी जातीयवादातून तात्यांध लोकांनी निर्घृण हत्या केलेली आहे. त्या गावातील जातीय तणाव दूर व्हावा आणि जातीय सलोखा राखून संविधानकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी व्हावी म्हणून वंचित बहुजन आघाडीने सर्वतोपरीन प्रयत्न केले आणि भिमजयंती गावात प्रथमच साजरी झाली मात्र या गोष्टीचा राग जातीयवाध्यांनी मनात धरून अक्षय वर हल्ला करुन त्याचा निर्घृण खून केला आणि माणुसकीचा मुडदा पाडला.
अक्षय भालेराव यांच्या खुनाचा वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने निषेध नोंदवीत आहे. यासोबत दुसरी घटना हातगाव तालुक्यातील मौ. वाळकी (खु) येथील आहे. या गावातील मातंग समाज हा आपले उधारकर्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करून बाबांना अभिवादन करीत असतात. मौ. वाळकी या गावात बौध्द समाज राहण्यास नसतानाही, तेथील मातंग समाज का साजरी करतोय ? ही बाब तेथील जातीयवादी मंडळीस खटकत होती. अस्वस्थ करीत होती. “भिमजयंती” साजरी केल्याचा राग मनात धरुन मातंग वस्तीवर रात्रीच्या वेळी लाईट बंद करुन जात्यांध जमावाने वस्तीवर सामुहिक हल्ला केला. या हल्ल्यात मातंग समाजाचा गायकवाड हा तरुण गंभीर जखमी झाला होता. सुदैवाने कोणाची प्राणहानी झाली नाही. तरी भविष्यात या जात्यांध लोकांचा बंदोबस्त न झाल्यास हीच जातीयवादी झुंड मातंग समाजातील कोण्यातरी स्वाभिमानी आंबेडकरी विचारांच्या तरुणाचा बळी घेतीलच अशी शक्यता निर्माण झालेली आहे. वाळकी येथील जात्यांध लोक सामुहिक हल्ला करुन थांबले नाहीत तर त्यांनी वाळकी गावातील मातंग समाजातील १५/१६ तरुणांवर दरोडयाचे खोटे गुन्हे नोंद करुन त्यांना जेलमध्ये टाकले आहे. या दोन्ही घटनावरुन नांदेड जिल्हयात मातंग आणि बौध्द समाज हा सातत्याने जातीयवादी समुहाचे अत्याचाराचा बळी ठरला आहे हे स्पष्टपणे दिसत आहे.
वरील दोन्ही घटनांचा वंचित बहुजन आघाडी जाहिरपणे निषेध करीत असून महाराष्ट्रात दलीत समाजावर अत्याचार व त्यांचे निर्घृण खून होण्याच्या घटना वाढताना दिसत आहेत. ही कृत्य अखंड मानव जातीस कलंक लावणारी व भारतीय धर्मनिरपेक्ष संविधानाची घोर पायमल्ली आहे. बौध्द, आणि पददलीत समाजावर होणारे जात्यांध समाजाचे जिवघेणे हल्ले बंद न झाल्यास तसेच सदरच्या गुन्हयात योग्यती कडक कारवाई न झाल्यास भवीष्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. असा इशारा निवेदाद्वारे प्रशासनाला देण्यात आला आहे.
भारत देशाची गरीमा आबाधित राखली जावी
या निवेदनातून महाराष्ट्र शासनाला विनंती करण्यात आली आहे की, नमुद्र घटनामधील गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करावी. त्यांना बारीकसारीक कलमे लावून जामीन मिळवून देणे म्हणजे अशा समाज आणि मानवता विघातक कृत्यांना पाठींबा देण्यासारखेच होईल. तरी बळीत व्यक्तीचे कुटुंबास मायबाप सरकार योग्यतो न्याय, नुकसान भरपाई तसेच शासन दरबारी नोकरी देवून आपली जबाबदारी पार पाडील अशी अपेक्षा आहे. तसेच माणुसकी आणि देश हितास काळीमा फासणाऱ्या या नराधमांचा कायम स्वरुपी बंदोबस्त करण्यासाठी सवर्ण, पददलीत आणि बौध्द यांच्यामध्ये सामाजिक सलोखा राबविण्यासाठी प्रशासनीक स्थरावर सातत्याने उपक्रम राबवावेत, तसेच समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य असलेल्या आपल्या भारत देशाची गरीमा आबाधित राखली जावी यासाठी यातील गुन्हेगारांविरुध्द कडक कारवाई करावी. अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. सदरचे निवेदन शुक्रवारी ( दिनांक ९ जून २०२३) लांजा येथील तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे. यावेळी जे.बी कांबळे (तालुका उपाध्यक्ष), मोहन धनावडे (उपाध्यक्ष), जगन्नाथ कांबळे ( प्रवक्ते), भीमराज कांबळे (देवधे ग्रा. म. सदस्य), भीमराज कांबळे ( देवधे तंटामुक्त अध्यक्ष ), प्रशांत प्र. कांबळे, आदी उपस्थित होते.