(मुंबई)
अकोला आणि शेवगावमधील दंगलींनंतर या दोन्ही ठिकाणी तणावपूर्ण शांतता असून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथिगृह येथे भेट घेतली. यावेळी राज्यात दंगली घडवून आणण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहेत. नागपूर एसआयटीने ६ महिन्यांपूर्वी एक अहवाल दिला होता. त्या अहवालात कधी – कधी, काय- काय घडू शकते हे सर्व नमूद करण्यात आले होते, असा दावा आंबेकर यांनी केला. सोबतच कॅमेऱ्यात दिसला म्हणून अटक करण्यापेक्षा दंगलीमागे ज्यांचा हात आहे, त्यांना पकडणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे दंगलीमधील मास्टरमाईंडवर कारवाई करा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना भेटून केल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणखी २ बॉम्ब फुटायचे बाकी
राष्ट्रवादीत बरेच राजकारण घडायचे आहे. २ बॉम्ब फुटले आहेत, अजून २ बॉम्ब फुटायचे बाकी आहेत. त्यामुळे ‘वेट अँड वॉच’… त्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण स्थिर होईल, असे भाकीतही प्रकाश आंबेडकर यांनी केले.