राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी नेमके काय निकष असावे, यासाठी शिक्षण विभागाचा विचार विनिमय सुरू असून, दहावीच्या विद्यार्थ्यांची सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्याबाबत सर्वेक्षण केले जाणार आहे.
अकरावी प्रवेशाकरिता गुण देण्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत स्वतंत्र ‘सीईटी’ घ्यावी का, याबाबत विद्यार्थ्यांचे मत जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे. शिक्षण विभागाने दिलेल्या लिंकवर जाऊन ही परीक्षा हवी की नाही, याबाबतचे मत विद्यार्थ्यांना मांडायचे आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात आल्यास ती ऑप्टिकल मार्क रेकग्निशन पद्धतीने घेतली जाणार आहे. ही परीक्षा सर्व विषयांची मिळून 100 गुणांची असेल व त्यासाठी एकच पेपर राहणार आहे. या परीक्षेचा कालावधी ठरविताना विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेप्रमाणे दोन तासांचा वेळ दिला जावा, अशाप्रकारचे नियोजन शिक्षण विभागाच्या विचाराधीन आहे. शिक्षण विभागाच्या सर्वेक्षण लिंकमध्ये विद्यार्थ्यांनी आपले नाव, शाळा, शिक्षण मंडळ याबाबतची माहिती भरून परीक्षा घ्यावी की नाही, यावर आपले मत स्पष्ट करायचे आहे. त्यानुसार शिक्षण विभाग प्रस्तावित परीक्षेबाबत विचार करायचा की इतर कोणत्या मार्गाचा अवलंब करायचा, हे ठरविणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दहावी विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा राज्यभरात ऑफलाईन पद्धतीने जुलै महिन्यात किंवा राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शाळेच्या ठिकाणी घेण्याचे नियोजन असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे तसेच दहावी विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार नसल्याने अंतर्गत मूल्यमापनासाठी नेमके काय निकष अवलंबावे, याबाबत विचार करीत आहे. शिक्षण तज्ज्ञ व शिक्षण क्षेत्रातील अधिकार्यांशी चर्चा करून यावर लवकर तोडगा काढण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.