(मुंबई)
ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता. या पुरस्काराचे मिळालेले २५ लाख रुपयांचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याची घोषणा आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केली. आप्पासाहेब म्हणाले की, मला मिळालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारचे श्रेय हे आपल्या सर्वांना जाते. एकाच घरात दोन वेळा पुरस्कार दिल्याची घटना यापूर्वी कुठेही झाली नाही.
नवी मुंबई येथील खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. या पुरस्कार सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी हजेरी लावली होती. या सोहळ्यासाठी लाखो लोकांनी उपस्थिती दर्शवली होती.
शेवटच्या श्वासापर्यंत समाजसेवेचे काम करणार
आज मला मिळालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारचे श्रेय हे आपल्या सर्वांना जात असल्याचे मत डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. एका घरात दोन वेळा पुरस्कार दिला जातो अशी घटना कुठेही झाली नसल्याचे धर्माधिकारी म्हणाले. आम्ही कामाची सुरुवात खेडेगावापासूनकेली होती. नानासाहेब धर्माधिकारी हे वयाच्या ८७ व्यावर्षापर्यंत काम करत होते. समाजसेवेचे काम हे कधीही पूर्ण होणार नाही. माझ्यानंतर सचिन धर्माधिकारी सुद्धा चांगले काम करत आहेत, असे धर्माधिकारी म्हणाले. या कार्यासाठी आणखी आयुष्य मिळावे असे वाटत असल्याचे आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले. शेवटच्या श्वासापर्यंत मी समाजसेवेचे काम करणार असून काम उत्तम असेल तर सन्मान होतोच असे, हा पुरस्कार नानांच्या आणि आपल्या सर्वांच्या चरणी अर्पण करत असल्याचं धर्माधिकारी म्हणाले.
समाजसेवा सर्वांत श्रेष्ठ आहे. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मी उभे केले. त्यामार्फत मी काम केले आहे. यामध्ये वृक्षारोपण आहे. ते काम करावे हे देखील सांगितले जाते. प्रत्येकाने पाच झाडे लावावीत, असे आवाहन डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केले. पाणी असते पण विकत घ्यावे लागते, त्यामुळं आपण पाणपोई उभ्या केल्या आहेत. ठिकठिकाणी आपण बस थांबे तयार करत आहोत. तसेच जलसंधारणाचे काम देखील आपण करत आहोत. पाणी वाचवण्याचे काम आपण केलं पाहिजे. मानवाने सुदृढ आयुष्य जगावे यासाठी आपण आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर घेतो. रक्ताची ज्याला गरज आहे त्याला मोठा उपयोग होईल. कोणीही आशिर्वादावर अवलंबून न राहता प्रत्येकान काम केले पाहिजे, असे ते यावेळी म्हणाले.
सोहळ्यासाठी खारघर येथील मैदानावर अप्पासाहेबांच्या 5 लाखांहून अधिक श्रीसदस्यांनी हजेरी लावली आहे. ते शुक्रवारपासूनच शिस्तीने नवी मुंबईकडे निघाले होते. गेल्या काही दिवसांपासून या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संपूर्ण सरकारी व भाजप – शिवसेनेची यंत्रणा हा सोहळा ‘ना भूतो न भविष्यति’ करण्यासाठी झटले. या कार्यक्रमासाठी सुमारे 600 हून अधिक स्वयंसेवक, 200 कर्मचारी तैनात करण्यात आले होते.