(नवी दिल्ली)
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)ने आपले ‘स्मॉल सॅटेलाइट लाँच व्हेईकल’ (एसएसएलव्ही) हे तंत्रज्ञान खासगी क्षेत्राला देण्याचा निर्णय घेतला आहे. इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथन यांनी ही माहिती दिली. हे तंत्रज्ञान खासगी क्षेत्राला देण्यासाठी ‘इस्रो’ लिलाव आयोजित करणार आहे. खासगी क्षेत्रात लघू उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी आवश्यक अशा या तंत्रज्ञानाला मागणी वाढत असताना ‘इस्रो’ने हा खासगीकरणाचा निर्णय घेतल्याने या निर्णयाला विरोध होत आहे.
‘इंडिया स्पेस काँग्रेस’च्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना ‘इस्रो’चे प्रमुख एस. सोमनाथन यांनी सांगितले की, ‘इस्रो’ने विकसित केलेले ‘एसएसएलव्ही’ तंत्रज्ञान हे खासगी क्षेत्राला देणार आहोत. हे तंत्रज्ञान खासगी उद्योगांना दिल्याने या तंत्रज्ञानाला असलेली वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी त्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊ शकेल. खासगी क्षेत्राला हे तंत्रज्ञान देण्यासाठी लिलावाचे आयोजन केले जाणार आहे.
500 किलोपर्यंत वजनाचे छोटे उपग्रह कमी उंचीवरील पृथ्वीच्या कक्षेत पाठवण्यासाठी ‘एसएसएलव्ही’ हे तंत्रज्ञान ‘इस्रो’ ने विकसित केले. हे सहावे व्हेईकल (उपग्रह अंतराळात घेऊन जाणारे वाहन) असून, यापूर्वी दोन विकास टप्प्यातील उड्डाणे घेण्यात आली होती. यातील एक उड्डाण गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात, तर दुसरे उड्डाण यंदा फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आले होते. ऑगस्ट महिन्यातील पहिले उड्डाण दुसर्या टप्प्यातील तांत्रिक बिघाडामुळे अपयशी ठरले होते. त्यानंतर ‘इस्रो’ने या बिघाडाचे सखोल विश्लेषण करून त्यातील दोष दूर केले. त्यानंतर यावर्षी फेब्रुवारी महिन्यात ‘एसएसएलव्ही’चे उड्डाण यशस्वी केले होते. ‘एसएसएलव्ही’ उपग्रह अंतराळात घेऊन जाण्यासाठी फिट ठरले होते. ‘एसएसएलव्ही’ने आतापर्यंत ‘इस्रो’चा एजड-07, अमेरिकन कंपनी अंटरिसचा ‘जेनस-वन’ आणि चेन्नई-आधारित स्पेस स्टार्ट-अप ‘स्पेस किड्झ’चा ‘आझादी सॅट-टू’ या उपग्रहांना 450 किमीच्या भ्रमणकक्षेत यशस्वीरित्या सोडले आहे. ‘एसएसएलव्ही’सारखे लहान रॉकेट हे 10 आणि 100 किलो वजन असलेल्या नॅनो आणि मायक्रो उपग्रहांचे प्रक्षेपण करते.
गेल्या वर्षी ‘इस्रो’ने ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’ (एचएएल) आणि ‘लार्सन अँड टुब्रो’ला पाच ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहने (पीएसएलव्ही) तयार करण्याचे कंत्राट दिले. ‘इंडियन स्पेस असोसिएशन’ आणि ‘ईवाय इंडिया’ या कन्सल्टन्सी फर्म ने नुकत्याच तयार केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, भारताचा देशांतर्गत अंतराळ उद्योग व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपण सेवा पुरवून 2025 पर्यंत अर्थव्यवस्थेत 13 अब्ज डॉलरचे योगदान देऊ शकतो. असे असूनही हे रॉकेट तंत्रज्ञान खासगी उद्योगांना विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘इस्रो’ने यापूर्वी ‘एसएलव्ही-3’, ‘एएसएलव्ही’, ‘पीएसएलव्ही’, ‘जीएसएलव्ही’ आणि ‘मार्क-3’ प्रक्षेपक वाहने विकसित केली आहेत. यातील ‘एसएलव्ही-3’ आणि ‘एएसएलव्ही’ यांना कालांतराने निवृत्त करण्यात आले आहे.