( खेड )
दारूच्या नशेत अंगावर डिझेल ओतून घेऊन स्वतःला पेटवून देत आत्महत्या करण्याचा प्रयत्न ट्रक क्लिनरने केला. आसपासच्या लोकांनी त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेल्याने त्याचा जीव वाचला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास लोटे औद्योगिक वसाहतीतील हिंदुस्थान रिव्हरसाईड कंपनीसमोर घडली . ट्रकचालकाने दिलेल्या माहितीनुसार , लोटे परशुराम ( ता . खेड ) येथील युनिलिव्हर या कंपनीमध्ये कच्चा माल घेऊन गुजरात जामनगर येथून एक ट्रक दोन दिवसांपूर्वी दाखल झाला होता. गाडीतील माल कंपनी आवारात काढून घेण्याचे काम रात्री आठ वाजता सुरू होते. या गाडीचा चालक कंपनीत होता. याचवेळी त्या चालकासोबत आलेल्या अंदाजे ४५ वर्षांच्या क्लिनरने गाडीच्या डिझेल टाकीतून डिझेल काढून घेतले आणि जवळच असलेल्या रिव्हरसाईड इंडस्ट्रीज या कंपनीसमोरील अंतर्गत रस्त्यावर जाऊन ते अंगावर ओतून घेत स्वतःला पेटवून दिले. जवळच झोपडीत राहणाऱ्या लोकांनी पाणी व अन्य साधनांनी ती आग आटोक्यात आणली . आवाशी गावातील तरुणांनी रुग्णवाहिका बोलावून चालकाच्या मदतीने त्याला खेड येथील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिले. घरडा कंपनीच्या वसाहतीतील रुग्णवाहिकेने यावेळी सहकार्य केले. अधिक उपचारांसाठी त्याला जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.