(मुंबई)
मीरा-भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनी पालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याला भररस्त्यात मारहाण केली. काशिमीरा येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे. त्यावेळी एका झोपड्डीपट्टीवर कारवाई चालू असताना ही घटना घडली.
ही कारवाई करत असताना पालिका अधिकाऱ्यांनी नियमाचे पालन केले नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत होता. याबाबत माहिती घेण्यासाठी आमदार गीता जैन गेल्या होत्या. यावेळी कनिष्ठ अभियंता शुभम पाटील आणि सोनी यांना त्यांनी खडसावले. तसेच पाटील यांच्या अंगावर जात शर्ट खेचला आणि त्यांच्या कानाखाली लगावली. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चर्चेचा विषय ठरला आहे. तर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी याबद्दल गीता जैन यांच्यावर टीका केली आहे.
आपल्या घरावर कोणतीही नोटीस न देता कारवाई केली जात असल्याची तक्रार अशोक सिंग यांनी गीता जैन यांच्याकडे केली होती. यानंतर गीता जैन घटनास्थळी पोहोचल्या. घरमालकांच्या भावना जाणून घेत असताना अभियंता हसल्याचं आपल्या निदर्शनास आलं. एखाद्या महिलेच्या भावना जाणून घेत असताना पालिका कर्मचारी महिलेवर हसत होता, हे आपल्याला सहन झालं नाही. पालिका अधिकाऱ्याला जाब विचारत असताना त्याला मारहाण झाल्याचं स्पष्टीकरण गीता जैन यांनी दिलं आहे.
‘मी केलेल्या मारहाणीचा मला पश्चाताप नाही. महिलेवर कुणी अत्याचार करेल तर त्याला माझी थप्पड नक्कीच भेटेल. माझ्याविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल झाला तरी मी त्याला सामोरं जाईन, कारण मी काहीही चुकीचं केलेलं नाही. पालिकेच्या अभियंत्यांनी अनेक ठिकाणी पैसे मागितल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आयुक्तांनी अशा लोकांना निलंबित करावं,’ अशी मागणी गीता जैन यांनी केली आहे.