गुहागर : महाराष्ट्र राज्यातील १ लाख ५ हजार ५९२ अंगणवाडी सेविका शासनाने दिलेले मोबाईल हॅण्डसेट परत करणार आहे. दोन वर्षांपूर्वी दिलेल्या हे हॅण्डसेट निकृष्ट दर्जाचे असल्याने नादुरुस्त होतात. परिणामी वैयक्तिक मोबाईलवरच काम करावे लागते. त्यामुळे गुहागर तालुक्यातील ७ बीटच्या प्रत्येकी ३ अंगणवाडी सेविका एकत्र येवून तालुक्यातील सर्वांचे मोबाईल गुरुवार २६ ऑगस्टला जमा करण्याची भूमिका घेण्यात आली आहे.
याबाबत अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्रच्या गुहागर तालुका अध्यक्ष सारीका हळदणकर म्हणाल्या की, राज्यातील अंगणवाडी सेविकांना गर्भवती महिला, स्तनदा माता, यांचा तपशील ॲपवर थेट पाठविण्यासाठी दोन वर्षांपूर्वी मोबाईल देण्यात आले होते. या मोबाईलला २ जीबी रॅम आहे. शासनाचे पोषण ट्रॅकर अॅप या मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन लाभार्थींची नावे, वजन, उंची, हजेरी, स्तनदा व गर्भवती मातांची अन्य माहिती आणि पोषण आहाराचे वाटप यांची माहिती दररोज अपलोड करण्यास सांगण्यात आले होते. परंतु ग्रामीण भागात इंटरनेटचा वेग कमी असल्याने अनेक अंगणवाडी सेविकांना हे ॲप डाऊनलोड करणेच अवघड बनले. अॅप इंग्रजीमध्ये असल्याने अनेकवेळा त्रयस्थाच्या मदतीने रेंजमध्ये येवून माहिती अपलोड करण्याचे काम करणे त्रासदायक ठरत आहे. सदर ॲपमध्ये डिलीटची सुविधा नसल्याने नजरचुकीने भरलेली एन्ट्री दुरुस्त करता येत नाही. निकृ्ष्ट दर्जाचे हॅण्डसेट असल्याने नादुरुस्त होतात. ते खर्च करण्यासाठी 3 ते 8 हजार रुपये खर्च येतो. त्यांचा आर्थिक बोजा अंगणवाडी सेविकांवर पडतो. त्यामुळे राज्यातील अनेक अंगणवाडी सेविका त्रस्त आहेत.
या संदर्भात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृति समितीने महिला व बालकल्याण मंत्री, प्रधान सचिव, आयुक्त एकात्मिक बाल विकास यांची भेट घेवून अडचणी सांगितल्या. मोबाईल सदोष असल्याचे सर्वांनी मान्य केले. मात्र नवे मोबाईल देणे आणि ॲपमध्ये दुरुस्ती करणे हे केंद्रसरकारच्या अधिन असल्याचे सांगत असमर्थता दर्शविली. दुसरीकडे महाराष्ट्रातील काही अधिकाऱ्यांनी मोबाईलवर माहिती न भरल्याने अंगणवाडी सेविकांना दंडात्मक कारवाई करण्याचे व मानधनातून सदर रक्कम कापण्याचे भय दाखविले. त्यामुळे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृति समितीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ९ ऑगस्टला झालेल्या सुनावणीत अंतिम निकाल लागेपर्यंत ॲपवर माहिती न भरता आल्यास मानधन कापू नये असे आदेश न्यायालयाने दिले.
या आदेशांनंतर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृति समितीच्या माध्यमातून मंहाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी सेविकांनी चांगल्या प्रतीचे मोबाईल द्या. अंगणवाडी सेविकांना मराठी भाषेमध्ये निर्दोष पोषण ट्रकर ॲप द्या. अशा लेखी मागण्या सादर केल्या. त्यालाही शासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने सर्व अंगणवाडी सेविकांना शासनाने दिलेले मोबाईल एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या कार्यालयात परत करण्यास सांगितले. त्याप्रमाणे गुहागरमधील अंगणवाडी सेविका आपले मोबाईल हॅण्डसेट गुरुवारी, २६ ऑगस्टला परत करणार आहेत.