(मुंबई)
पोलिस म्हणजे, समाजात शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करणारे व्यक्तीमत्त्व समजले जाते. मात्र या प्रतिमेला मुंबईतील एका घटनेने डाग लागण्यास भाग पाडले आहे. मुंबई पोलिस दलाच्या नागपाडा मोटार परिवहन विभागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
मोटार परिवहन विभागात काम करणा-या आठ महिला पोलीस शिपायांवर तीन वरिष्ठ पोलीस अधिका-यांकडून अनेकदा बलात्कार करण्यात आला. एवढेच नाहीतर महिला पोलिस गरोदर राहिल्यानंतर त्यांच्यावर जबरदस्ती करुन त्यांना गर्भपात करण्यास भागही पाडण्यात आले याबाबतचे पत्र माध्यमांमध्ये आले आहे. अशा आशयाचे पत्र एकनाथ शिंदेंसह मुंबई पोलिस आयुक्त आणि पोलिस सहआयुक्त यांना पाठवण्यात आले आहे, अशी माहिती आहे. त्यामुळे नेमके प्रकरण काय आहे, याची चर्चा मुंबई पोलिस दलात सुरु आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, शारीरिक संबंध ठेवतानाचे व्हिडीओ देखील या अधिका-यांनी बनवल्याचा आरोप महिला पोलिस अधिका-यांनी केला आहे. त्यानंतर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार त्यांच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप महिला पोलीस कर्मचा-यांनी केला आहे, असा उल्लेख या पत्रात आहे. पत्रात असे लिहिण्यात आले आहे की, आम्ही छोट्याशा गावातून आल्यामुळे आमचा गैरफायदा घेण्यात आला. आम्हाला ड्युटीअर कोणतेही काम न देण्याचे आमिष दाखवून वरिष्ठांनी आम्हाला शासकीय निवासस्थानी नेऊन आमच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले.
महिला पोलीस कर्मचा-यांनी वरिष्ठ पोलिस अधिका-यांची तक्रार करणारे पत्र पोलिस अधिका-यांना पाठवले आहे. आपल्या तक्रार अर्जात महिला पोलीस कर्मचा-यांनी आपल्यासोबत घडलेली आपबिती सांगितली आहे. तसेच, पोलीस कर्मचा-यांनी पोलिस आयुक्तांकडे वरिष्ठ पोलीस अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.
पत्र बनावट असल्याचा दावा
दरम्यान, जे पत्र माध्यमांमध्ये आले आहे, ते पत्र बनावट असल्याचा दावा आता करण्यात येत आहे. अशी कोणतीही घटना घडलेली नाही, जी घटना माध्यमांमध्ये आली आहे, ती चुकीची आहे, असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. “आमची बदनामी करण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला आहे. आम्ही निर्दोष आहोत. विभागातील काही लोक आमच्या कामावर नाराज आहेत. मोटार वाहन विभागातील एका अधिकाऱ्याच्या यात सहभागाचा आम्हाला ठाम संशय आहे. याप्रकरणी आम्ही पोलीसांत तक्रार नोंदवू”, अशी माहिती एका पोलीस निरीक्षकाने दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.