(मुंबई / किशोर गावडे)
हरियाणा राज्य कबड्डी संघटनेच्या विद्यमाने २३मार्चपासून होणाऱ्या “६९व्या राष्ट्रीय महिला” कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने आपल्या संभाव्य खेळाडूंचे सराव शिबिर आयोजित केले आहे. महर्षी दयानंद महाविद्यालय व राष्ट्रीय मिल मजदूर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १६ मार्चपासून महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर हे सराव शिबीर होणार आहे. कामगार नेते आमदार सचिन अहिर यांच्या हस्ते सायं. ५-००वाजता या शिबिराचे उदघाटन होईल.
याप्रसंगी राज्य कबड्डी संघटनेचे सचिव आस्वाद पाटील, महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती छाया पानसे, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सचिव गोविंदराव मोहिते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. निवड झालेल्या सर्व महिला खेळाडूंनी या परिपत्रकाद्वारे कळविण्यात येथे की सर्वांनी दि.१६ मार्च रोजी सकाळी ११-००वा. आपल्या पत्रकात दिलेल्या ठिकाणी आपली उपस्थिती राखावी, असे सचिव आस्वाद पाटील यांनी कळविले आहे.