(नवी दिल्ली)
पीएचडी करू इच्छिणा-या परंतु पदव्युत्तर पदवी पूर्ण न केल्याने पीएचडी न करू शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी यूजीसीने बुधवारी मोठा दिलासा दिला आहे. चार वर्षांच्या बॅचलर अभ्यासक्रमाला असलेले विद्यार्थी आता थेट पीएचडी करू शकणार आहेत. या विद्यार्थांना यासाठी वेगळी पदव्युत्तर पदवी करण्याची गरज भासणार नाही, असेही आयोगाचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी स्पष्ट केले.
यूजीसी ब-याच काळापासून पदवीपूर्व कार्यक्रम पूर्ण करण्याचे मानक आणि पद्धत बदलण्याची तयारी करत होते. त्यासाठी नवा अभ्यासक्रम राबविण्याचा त्यांचा विचार होता. अखेर यामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. अलीकडेच यूजीसीने ४ वर्षांचा कार्यक्रम म्हणून ऑनर्स पदवी अभ्यासक्रम परिभाषित करून पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी नवीन क्रेडिट आणि अभ्यासक्रम फ्रेमवर्क जाहीर केले होते.
दरम्यान, यूजीसीचे अध्यक्ष प्रा. एम जगदीश कुमार म्हणाले की, विद्यापीठे तीन ते चार वर्षांच्या कार्यक्रमांची निवड करू शकतात. यासाठी काय शिकवायचे किंवा कोणते अभ्यासक्रम चालवायचे आहेत, याचा सर्वस्वी निर्णय विद्यापीठांवर सोडण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि गरजा लक्षात घेऊन विद्यापीठे स्वत: याबाबत निर्णय घेऊ शकतात. मात्र, चार वर्षांचा पदवीपूर्व कार्यक्रम पूर्णपणे लागू होईपर्यंत ३ वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम बंद केला जाणार नसल्याचे जगदीश कुमार यांनी स्पष्ट केले.