( रत्नागिरी / प्रतिनिधी )
पासपोर्ट नूतनीकरणासाठी लाच स्वीकारणाऱ्या मुंबईतील खासगी एजंटला रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. रत्नागिरीतील हॉटेलमध्ये ४५ हजारांची लाच स्वीकारताना आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणात अन्य एका आरोपीला अटक करण्यात आले आहे.
शेखर मुरलीधर नेवे (वय 51,खाजगी इसम रा.माहीम पश्चिम, मुंबई) आणि प्रकाश कुमार झरिमंडल (वय 32, डाटा ऑपरेटर, प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, बीकेसी मुंबई. रा. कालिना मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
तक्रारदार यांचा पासपोर्ट नूतनीकरणासाठी ऑनलाईन अर्ज सादर केला होता. सदरचा अर्ज काही तांत्रिक कारणामुळे पुनरावलोकन करिता प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय बी के सी मुंबई येथे प्रलंबित होता. तो मंजूर करून देण्यासाठी आरोपी खाजगी एजंट यांनी तुमचे काम करून देतो असे सांगून पासपोर्ट कार्यालय बी के सी मुंबई येथील डेटा ऑपरेटर प्रकाश मंडल यांना देण्यासाठी १ लाख ८५ हजार व स्वतः साठी ५ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर तडजोडीअंती पासपोर्ट कार्यालय बी के सी मुंबई येथील डाटा ऑपरेटर प्रकाश मंडल याना देण्यासाठी ८० हजार रुपये व स्वतः साठी ५ हजार रुपयांची मागणी केली.
बुधवार १ फेब्रुवारी रोजी पासपोर्ट कार्यालय बी के सी मुंबई येथील प्रकाश मंडल याना देण्यासाठी पहिला हप्ता म्हणून ४० हजार रुपये व स्वतः साठी ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना नेवे यांना अटक करण्यात आली. तर दुसऱ्या आरोपीला मुंबई येथून ताब्यात घेण्यात आले.ही कारवाई पोलिस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.