(रत्नागिरी)
भाट्ये खाडीचे मुख असलेल्या मांडवी बंदरातील गाळ उपसा करण्यासाठी जमातुल मुस्लिमीन राजिवडा कोअर कमिटी पुरस्कृत मच्छिमार संघर्ष समितीने राजिवडा, फणसोप, भाट्ये आणि सोमेश्वर येथे आयोजित केलेल्या बैठकांना मच्छिमारांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. तसेच मच्छिमारांकडून या लढ्याला पाठींबा दर्शविण्यात आलेला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २६ जानेवारी रोजी करण्यात येणाऱ्या बेमुदत उपोषणाला मच्छिमार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.
भाट्ये खाडी परिसरातील मच्छिमारांचा मासेमारी हा मुख्य व्यवसाय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भाट्ये खाडीचा परिसर गाळाने साचलेला आहे. मात्र, भाट्ये खाडीचे मुख असलेल्या मांडवी बंदर हेही गाळाने भरल्याने मच्छिमारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. मांडवी बंदरातून समुद्रात ये-जा करण्यासाठी मासेमारी नौकांना समुद्राला येणाऱ्या भरतीची वाट पहावी लागते. या गाळामुळे अनेकदा नौका बुडून लाखो रुपयांचे मच्छिमारांचे नुकसान झालेले आहे. शिवाय नौकांवरील खलाशी बुडाल्याच्या दुर्दैवी घटनाही येथे घडलेल्या आहेत.
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून मांडवी बंदरातील गाळ उपसा करणेबाबत राजिवडा, कर्ला, फणसोप आणि भाट्ये येथील मच्छिमार संस्थांकडून मागणी करण्यात आलेली असतनाही त्याकडे शासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले. त्याचे दुष्परिणाम म्हणून खाडी परिसरातील मच्छिमारांच्या अस्तित्वाचा पश्न निमर्माण झालेला आहे. त्यामुळे मागील दोन वर्षापासून गाळाचा प्रश्न मच्छिमार संघर्ष समितीने हाती घेतला आहे. त्यासाठी अनेकदा शासनाकडे निवेदने देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखेर संघर्ष समितीने गाळाच्या प्रश्नासंदर्भात लढा अधिक तीव्र करण्यासाठी २६ जानेवारीपासून बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय जाहीर करुन शासनाला त्याबाबतचे निवेदनही देण्यात आले.
त्यासाठी मच्छिमार संघर्ष समितीने भाट्ये खाडी परिसरातील गावागावात जाऊन मच्छिमारांच्या बैठका घेण्यात सुरुवात केली आहे. फणसोप, भाट्ये, राजिवडा आणि सोमेश्वर गावामध्ये मच्छिमारांच्या बैठका घेण्यात आल्या. या बैठकांना मच्छिमारांनी प्रतिसाद देत बेमुदत उपोषणाला पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. या वेगवेगळ्या गावातील बैठकांमध्ये राजिवडा कोअर कमिटीचे अध्यक्ष नजीर वाडकर, कार्याध्यक्ष इम्रान सोलकर, उपाध्यक्ष शब्बीर भाटकर, सईद फणसोपकर, सेक्रेटरी शफी वस्ता, फकीर मिरकर, रहिम दलाल, लुकमान कोतवडेकर, मच्छिमार संघर्ष समितीचे अध्यक्ष दरबार वाडकर, मुनीर मुकादम, युसूफ भाटकर, अरमान भाटकर, जाविद होडेकर, अझीम होडेकर, मजहर मुकादम, अतिक गडकरी, दिलावर मुकादम, रमजान सोलकर यांनी नेतृत्व केले.