(मुंबई / किशोर गावडे)
पुण्याने महिलांत, तर मुंबई शहरने पुरुषांत “२१व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक” कबड्डी स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. दोन्ही संघांनी या वर्षात “हॅट्रिक” साजरी केली. मुंबईमध्ये आणि पुणे शहरात फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी करून विजयाची परंपरा कायम राखली गेली.
अहमदनगर येथे झालेली ७०वी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी, बारामती-पुणे येथे झालेली मिनी ऑलम्पिक स्पर्धा आणि आता छत्रपती शिवाजी महाराज चषक हे तिसरे जेतेपद. जळगांव येथील सागर पार्क मैदानातील मॅट वर झालेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात पुण्याने मुंबई उपनगरचा प्रतिकार ३७-२८ असा मोडून काढत रोख रु. एक लाख पन्नास हजार(₹१,५०,०००/-) व छत्रपती शिवाजी महाराज चषक आपल्या नावे केला. उपविजेत्या उपनगरला चषक व रोख रु. एक लाख (₹१,००,०००/-) वर समाधान मानावे लागले. पहिल्या डावात लोण देत २०-१६ अशी आघाडी घेणाऱ्या पुण्याने दुसऱ्या डावात आणखी एक लोण देत ३७–२८ अशा ९ गुणांच्या फरकाने आपला विजयावर शिक्कामोर्तब केले. पूणेच्या निकिता पडवळ, आम्रपाली गलांडे यांच्या संयमी चढाया, त्याला साक्षी गावडे, पूजा शेलार यांनी उत्कृष्ट पकडी करीत दिलेली मोलाची साथ यामुळे पुण्याला हे शक्य झाले. तर उपनगरच्या हरजित कौर संधू हिला अन्य खेळाडूंची म्हणावी तशी साथ मिळाली नाही. हरदजीत कौर शेवटच्या मिनिटापर्यंत जिद्दीने आणि तडफेने खेळली.
पुणे जिल्ह्याने सामना जरी जिंकला तरी जळगावात एकच चर्चा हरजितकौर संधू हिची होती. हरजितकौर संधूने आपल्या नावावर एकूण ६ सामन्यात ७५ गुणांची कमाई केली. तर पकडीत ११ गुण मिळवले.तर आम्रपाली गलांडे ६ सामन्यात ६६ गुण मिळवले.व निकिता पडवळ हिच्या खात्यात ६ सामन्यात ५३ गुणांची नोंद झाली. मुंबई उपनगरच्या शुभदा खोत, यशिका पूजारी, प्रणाली नागदेवता, करीना कामतेकर यांनी या सामन्यांत प्रभावी कामगिरी केली. मात्र शेवटच्या चार मिनिटात प्रयत्न तोकडे पडले.
पुरुषांच्या अंतिम सामन्यात मुंबई शहरने अहमदनगरचे आव्हान २८-२५ असे परतवून लावत छत्रपती शिवाजी महाराज चषक व रोख रु. एक लाख पन्नास हजार(₹१,५०,०००/-) आपल्या खात्यात जमा केले. उपविजेत्या अहमदनगरला चषक व रोख रु. एक लाख (₹१,००,०००/-) वर समाधान मानावे लागले. मुंबईने नाणेफेक जिंकत मैदानाची निवड केली. नगरने आक्रमक सुरुवात करीत पहिल्या काही मिनिटात आघाडी घेतली. पण त्याने विचलित न होता मुंबईने पहिल्या सत्रातच २ झटपट लोण नोंदवित २१-०८ अशी भक्कम आघाडी घेतली.
प्रेक्षक जयघोष करत अहमदनगरला साथ देत होते. त्याचवेळी कणकवलीकर प्रणय राणेने सर्वांना संयमी राहण्याचा सल्ला दिला. मात्र मुंबई शहरचे अखेर पर्यंत संतुलन बिघडले गेले नाही, हे विशेष. जिद्दीने प्रयत्न सुरू करायचे आणि सामना जिंकायचा असा चंग बांधून परिपूर्ण संघ मैदानात उतरला होता. हॅट्रिक साध्यच करायची हे मुंबईच्या सिद्धिविनायकाकडे साकड घातलं होतं.
उत्तरार्धात मात्र सावध खेळ करण्याच्या नादात बेसावध रहाणाऱ्या मुंबईवर नगरने चांगले मोहरे टिपले व मैदानाच्या बाहेर बसवले. चढाईपटटू व हुकमी डिफेंडर मैदानात नाही हे लक्षात घेऊन नगरकरांनी लोन उशिरा मारायचे मनात ठरविले. व कालांतराने
एक लोण देत आपली आघाडी कमी केली. मुंबई शहरच्या खेळाडूंचे लक्ष सर पंचांकडे होते किती मिनिटांमध्ये आता किती चढाया होतील याची गणितं मैदानात सुरू होती. तिसऱ्या चढाईला अटॅक करायचा हा निर्णय घेतला होता. सामन्याची मिनिटे कमी होत होती. मात्र गुणांची बरोबरी होत नव्हती. पुन्हा काही गुण घेत आघाडी एका गुणापर्यंत नगरने खाली आणली. नंतर मात्र अतिशय संयमाने खेळ करीत ३ गुणांनी मुंबईने विजेतेपदाचा चषक उंचावला.
चढाईची धुरा प्रणय राणे, अक्षय सोनी, सुशांत साईल, हर्ष लाड, ओमकर मोरे, संकेत सावंत यांनी सांभाळली. यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर संकेत सावंत, हर्ष लाड यांच्या भक्कम पकडी मुळे मुंबईने विजयावर अखेर शिक्कामोर्तब केले. आणि त्याच क्षणी वडाळ्याच्या कबड्डी कार्यालयासमोर, वरळी,ना.म.जोशी मार्ग, लोअर परळ, विभागात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. अष्टपैलू खेळाडू शिवम पठारे, तुळशीदास वायकर, अजित पवार राहुल धनावडे, संभाजी वाबळे यांनी अहमदनगरकडून शेवटच्या क्षणापर्यंत शर्थीची लढत दिली. पण संघाला विजयी करण्यात ते अपयशी ठरले.
या सामन्यात मुंबई शहर संघाचा अष्टपैलू खेळाडू प्रणय राणे यांने एकूण ६ सामन्यात ४५ सक्सेसफुल चढाया करून ६५ गुणांची कमाई केली . २ सुपर रेड केल्या. या स्पर्धेच्या निमित्ताने राष्ट्रीय पंच व कबड्डी विश्लेषक अनिल भोईर यांची मोलाची साथ मिळाली.