(नवी दिल्ली)
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी फ्रान्समधील भारतीय प्रवासी समुदायाला संबोधित करताना भारत २०२७ पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास व्यक्त केला. भारताची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकाची आहे. २०२७-२८ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था जगात तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असे म्हटले.
भारताची अर्थव्यवस्था आज ३.५ ट्रिलियन डॉलरची आहे आणि २०४७ पर्यंत ती ३० ते ३५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होईल. तेव्हा आपण स्वातंत्र्याची १०० वर्षे साजरी करू. भारताने निर्यातीतही आघाडी घेतली आहे. गतवर्षी ६७६ अब्ज अमेरिकी डॉलर एवढी निर्यात केली होती. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात आपण ७५० अब्ज डॉलरची निर्यात पार केली आहे. भारत आज एक गो-टू कंट्री, जगाची फार्मसी, जगाचा फूड बाऊल आणि इतर देशांसाठी एक विश्वासू भागीदार म्हणून उदयास येत आहे, असेही ते म्हणाले.
भारत फ्रान्ससोबतच्या भागीदारीला खूप महत्त्व देतो. पॅरिसमधील भारतीय समुदायाला संबोधित करताना ते म्हणाले की, तुमच्यापैकी प्रत्येकाने ओळखले आहे की ही भागीदारी संधी आणि मैत्री दोन्ही वाढवेल. आमची भागीदारी पुढे नेण्यात तुम्ही सर्वजण महत्त्वाची भूमिका बजावाल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय आणि आवडते नेते आहेत आणि ते भारत आणि जगाची काळजी घेण्याच्या वचनबद्धतेसाठी ओळखला जातो. त्यांचा एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य यावर विश्वास आहे, असेही गोयल म्हणाले.
भारतीय संस्कृतीचा प्रसार करायला हवा
भारतीय समुदायाचे कौतुक करताना पीयूष गोयल म्हणाले की, भारत हा कॅपेबिलिटीज, कॅपेसिटीज, कॉम्पिटन्सी आणि कॉन्फिडन्स असलेला एक नवीन भारत आहे. ज्याचे तुम्ही सर्वजण प्रतिनिधित्व करता. राष्ट्राचे दूत म्हणून तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी आणि मातृभूमीसाठी योगदान देत आहात, अशा शब्दांत त्यांनी गौरवोद्गार काढले. भारतीय समुदायाला भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी होण्यासाठी आणि फ्रान्समध्ये भारतीय संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.
भारत-फ्रान्स बिझनेस समिटसाठी पॅरिसमध्ये
इंडिया फ्रान्स बिझनेस समिटसाठी पियूष गोयल पॅरिसमध्ये दाखल झाले आहेत. एवढेच नाही तर गोयल भारत-फ्रेंच मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत आहेत. या निमित्त भारत-फ्रान्समध्ये व्यापार शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत दोन्ही देशांचे वाणिज्य मंत्री हजेली लावणार आहेत.
द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा
ग्रीन फ्युचर, उदयोन्मुख तंत्रज्ञान, संरक्षण सहकार्य आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशातील सहकार्य यावर या शिखर परिषदेत लक्ष केंद्रित केले जाणार आहे. पॅरिसमधील भारतीय दूतावासाद्वारे बिझनेस समिट आणि सीईओ गोलमेज आयोजित केले जात आहे. या बिझनेस समिटसाठी ४०० हून अधिक स्पर्धकांनी नोंदणी केली आहे.