(नवी दिल्ली)
भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यासंदर्भात दिल्लीत एक महत्त्वाची बैठक झाली. यामध्ये लोकसभा आणि विधानसभेबाबत अजेंड्यावर चर्चा झाली. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी २०२४ च्या मेगा प्लॅनबाबत सूचना केल्या. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नड्डा आणि भाजपचे राज्य असणा-या राज्यातील १२ मुख्यमंत्री आणि ५ उपमुख्यमंत्री, ३५ केंद्रिय मंत्री यांच्यासोबत जवळपास ३५० नेते उपस्थित होते.
.
वर्ष २०२३ विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने महत्वाचे आहे. त्यामुळे तात्काळ कामाला लागा. गुजरातमध्ये ज्या प्रकारे आपण कष्ट घेऊन १५० जागा निवडून आणल्या आहेत. त्याच प्रकारे आता या वर्षी होणा-या ९ विधानसभा निवडणुकांत वर्चस्व प्राप्त करायचे आहे. एकाही राज्यातील सत्ता जाता कामा नये. कार्यकर्त्यांनी आतापासूनच जोमाने कामाला लागा. आपल्याला जास्तीत जास्त बूथपर्यंत पोहोचायचे आहे. सुरुवातीला ७० हजार टार्गेट होते. मात्र, आपण १ लाख ३० हजार बूथपर्यत पोहचलो आहोत. अजूनही कमजोर बूथ ओळखून त्याठिकाणी काम वाढवा. २०२४ मध्ये आपल्याला पुन्हा एकदा सत्ता मिळवायची आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुका गांभीर्याने घ्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली कामे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवा. गरीब कल्याण योजना, अन्न सुरक्षा योजना याबाबत माहिती द्या.