(नागपूर)
जगभरात अनेक महत्त्वाच्या रोगांवर लसी विकसित होत असून भविष्यात काही रोग हद्दपार होणार आहेत. पुढील पंधरा वर्षांत भारतातून टायफाइड आणि डायरियासारख्या रोगांनी मृत्यू होणार नाहीत. हे रोगच हद्दपार होतील, असा विश्वास कोव्हॅक्सिनचे निर्माते व भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. कृष्णा एम. एल्ला यांनी व्यक्त केला.
नागपूर शहरात ७२ व्या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसचे आयोजन करण्यात आले. या काँग्रेसमध्ये सहभागी होण्यासाठी एल्ला शहरात आले असता त्यांनी ही माहिती दिली. जगभरातील कंपन्या नव्या ॲन्टिबायोटिक्सच्या उत्पादनाबाबत निरुत्साही झाल्यात. ऍन्टिबायोटिक्सच्या किमती कमी झाल्याने त्यात फारसा नफा नाही. त्यामुळे भविष्यात मोठा धोकाही निर्माण होऊ शकतो. मात्र, दुसरीकडे अनेक रोगांवर थेट औषधे, उपचार यंत्रणा किंवा लसीचे नवे तंत्रज्ञान विकसित होतेय ही चांगली बाब आहे. प्रत्येक राज्याचे स्वतंत्र असे अन्न व औषधी प्रशासन आहे. कंपन्यांना विविध राज्यात व्यवसाय सुरू करताना ब-याच अडचणी येतात. यामुळे संपूर्ण देशाचा असा एकच अन्न व औषधी प्रशासन विभाग असावा, अशी सूचना आपण अलीकडेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कोव्हॅक्सिनच्या संशोधनाचा शोधप्रबंध आम्ही ‘नेचर’ या सायन्स जर्नलकडे पाठविला होता. मात्र, या प्रकल्पासाठी वापरलेली माकडे आम्ही अवैध पद्धतीने घेतली, असे आरोप करणारी पत्रे आपल्या देशातील काहींनी या जर्नलला पाठविली. हे एक उदाहरण झाले. भारतीयांचे खरे शत्रू इतर देश नाहीत तर भारतीयच असल्याचीही टीका त्यांनी यावेळी केली.