(मुंबई)
देशातील १९ वी वंदे भारत एक्स्प्रेस मडगाव-मुंबई मार्गावर सुरू होणार आहे. मात्र, १५ ऑगस्टपर्यंत देशात ७५ वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. सध्या जून सुरू झाला आहे. पुढील दोन महिन्यांत ७५ चा आकडा गाठणे कठीण आहे. त्यामुळे हे स्वप्न अधुरेच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण सध्याचा वंदे भारत ट्रेन बनवण्याचा वेग पाहता ऑगस्टपर्यंत केवळ १० ते १२ ट्रेनच बनू शकतात. त्यादेखील केवळ ८ डब्यांच्या, असे सध्याचे चित्र आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ फेब्रुवारी २०१९ ला नवी दिल्ली स्थानकात हिरवा झेंडा दाखवून पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसला लोकार्पित केले आणि भारतीय रेल्वेचे नवे पर्व सुरू झाले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचे मोदींनी गेल्या वर्षी झालेल्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात लाल किल्ल्यावरून जाहीर केले होते. त्यासाठी केंद्र सरकारने आखणीही केली. परंतु हे मोठे काम असल्याने प्रत्यक्षात अर्धेही उद्दिष्ट गाठता येणार नसल्याचे बोलले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यावेळी एका वर्षात ७५ वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचे आव्हान भारतीय रेल्वेला दिले, त्यावेळी भारतीय रेल्वेकडे इतक्या मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक रेल्वे निर्मिती करण्याची यंत्रणा उपलब्ध नव्हती. वंदे भारत एक्स्प्रेस चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीत बनवण्यात येतात. सध्या तिथे उत्पादनाची पूर्ण क्षमता लावून १६ डब्यांच्या महिन्याला केवळ ४ वंदे भारत एक्स्प्रेस बनवण्यात येत आहेत. अशा प्रकारच्या एकूण १८ वंदे भारत एक्स्प्रेस आतापर्यंत बनवण्यात आल्या आहेत. जी १९ वी वंदे भारत एक्स्प्रेस मडगाव आणि मुंबईच्या दरम्यान धावेल, ती तर केवळ आठ डब्यांचीच आहे.
दुसरीकडे याच वंदे भारत एक्स्प्रेसचे दुसरे स्लीपर कोच असलेले व्हर्जन निर्माण करण्यासाठी रशियाच्या टीएमएच आणि भारतातील रेल विकास निगम लिमिटेड या दोन कंपन्यांच्या जॉईंट व्हेंचरला कंत्राट देण्यात आले होते. तब्बल ३० हजार कोटींपेक्षा जास्तीच्या या कंत्राटात १२० स्लीपर क्लास वंदे भारत एक्स्प्रेस बनवण्यात येणार होत्या. मात्र, रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे जगाने रशियावर टाकलेल्या वेगवेगळ्या निर्बंधांमुळे ही योजना संकटात सापडली आहे.
वंदे भारत एक्स्प्रेस या खरे तर १६ डब्यांच्या बनवण्याचा मुख्य प्लॅन होता. मात्र, टार्गेट पूर्ण होत नाही, हे लक्षात येताच आता ८ डब्यांच्या वंदे भारत एक्स्प्रेस बनवण्यास सुरुवात करण्यात आलीे. या कमी डब्यांच्या एक्स्प्रेसमुळे प्रवासी वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात लातूर कोच फॅक्टरीमधून वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती सुरू करण्याचा प्लॅन आहे. मात्र, तिथेही महिन्याला ४ ते ५ वंदे भारत एक्स्प्रेस बनतील असे चित्र आहे. त्यामुळे चेन्नई आयसीएफ येथील जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील ८ ते १० आणि लातूर कोच फॅक्टरी येथील जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील ८ ते १० वंदे भारत एक्स्प्रेस येत्या काळात बनून तयार होतील. मात्र, त्यामुळे नरेंद्र मोदींनी रेल्वेला दिलेले टार्गेट पूर्ण होणार नाही. तर नियमित रेल्वे वाहतुकीवर परिणाम करून वंदे भारत एक्स्प्रेसचा अट्टाहास कशासाठी केला जातोय, असा प्रश्न आता जनतेतून उपस्थित होत आहे.