( पाली / वार्ताहर )
मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणार्या ह्यान कंपनीच्या निष्काळजीपणामुळे पाली बाजारपेठेतील जलवाहिनी वारंवार फुटत असल्याने आता पाणीपुरवठा गेल्या पाच दिवसांपासून बंद झाला असूनही दुरुस्ती केली जात नाही. पाली बाजारपेठेमध्ये महामार्ग चौपदरीकरणाचे कामकाज ठेकेदाराने सुरू केले असून त्यामध्ये जुन्या महामार्गाच्या लगत असणारी ग्रामपंचायतची शासकीय पाणी योजनेची जलवाहिनी प्राधान्याने स्थलांतरण करून घेणे आवश्यक होते. परंतु ती तिथेच ठेवल्याने ती वारंवार फुटून, गेल्या काही महिन्यांपासून बाजारपेठ, नवीन वसाहत, कोल्हापूर रोड या भागातील पाणी पुरवठा बंद राहत आहे.
बाजारपेठेमध्ये महामार्ग चौपदरीकरणाचे काम केले जात आहे. त्यातच बाजारपेठच्या दोन्ही भागात रस्त्यालगत मातीच्या भरावावर जाडी खडी आणून सपाटीकरण करून सेवा रस्त्याचे काम केले जात आहे. यामुळे जुन्या पाणी योजनेची जलवाहिनी वारंवार फुटून पाणी पुरवठा बंद राहतो आहे. त्यामूळे याकामा अगोदर पाली ग्रामपंचायतची बाजारपेठेतील जुनी शासकीय पाणी योजना स्थलांतरण करणे आवश्यक आहे.
तसेच दोन्ही बाजुकडील चौपदरीकरणातील बाधीत होणारी बांधकामे हटवलेली असून जागा मोकळी असल्याने ह्यान कंपनीने प्राधान्याने पाणी योजेनेचे जलवाहिनीचे स्थलांतरण करणे आवश्यक आहे. पालीतील या पाणीपुरवठा जलवाहिनीच्या कामाकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाने वेळीच लक्ष देऊन पर्यायी पाणी पुरवठा वाहिनी टाकण्याची व्यवस्था प्राधान्याने करून मगच काम करण्याची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने शासकीय पाणी पुरवठा बंद होण्यास व ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित ठेवणार्या कंपनीवर योग्य कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.