माणूस उत्सवप्रिय प्राणी आहे. जगातील सगळ्या देशांत सण, उत्सव, साजरे होतात. भारत तर सणांचा राजा ठरावा इतके सण येथे साजरे होतात. त्यातही भारतीय उत्सवाच्या मागे कृतज्ञता, आदर, प्रेरणा इत्यादी भावनांची दृष्टी दिसून येते. पोळा, वेळा अमावास्या, पशुधन, काळी आई, यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून, तर श्रीरामजयंतीसारखे उत्सव धर्मकार्याची प्रेरणा मिळावी म्हणून, पाडवा (चैत्री), दसरा, महापुरुषांच्या विजयाच्या स्मरणार्थ साजरे होतात. संक्रांत, दिवाळी, सामाजिक सद््भाव वाढावा म्हणून संपन्न होतात. काही सण स्त्रीप्रधान उदा. वटसावित्री पौर्णिमा, तर काही उत्सव पुरुषप्रधान उदा. होळी आहे. हे सण साजरे करण्यामागे शास्त्रीय, सामाजिक भूमिकाही असते. श्रीगणेशोत्सव, राखी पौर्णिमा असे पर्व सामाजिक सद््भाव वृद्धिंगत होण्यासाठी साजरे होतात. यात हुताशनी (शिमगा, होळी) पौर्णिमा हा पुरुषप्रधान उत्सव असून, त्यामागे मानसशास्त्रीय कारणपरंपरा आहे. सर्वादौ या उत्सवाचा पुराणोक्त इतिहास पाहूया…
श्रीकृष्ण बालक असताना पूतना राक्षसी त्याला मारण्यासाठी धावून आली आणि बाळकृष्णाने तिचा वध केला. तिचा तो विशाल देह उचलणे शक्य होणार नाही म्हणून सवंगड्यांनी त्याचे तुकडे केले आणि ते मोठ्या चितेवर रचून चिता पेटवून दिली. कृष्णाचा प्राण घेऊ पाहत होती त्या पूतनेच्या चितेभोवती प्रदक्षिणा घालत तिला शिव्यांची लाखोली वाहिली. तो दिवस फाल्गुन पौर्णिमा. या प्रसंगाच्या स्मरणार्थ हा सण साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी होळीची राख अंगाला फासून त्या राक्षसीच्या मृत्यूचा आनंद व्यक्त केला जातो.
आणखी एक कथा प्रल्हादाच्या जीवनासंबंधी आहे. सिंहिका ही प्रल्हादाची आत्या. तिला अग्नीपासून धोका नव्हता. हिरण्यकशिपूने प्रल्हाद हत्येचे अनेक प्रयत्न केले. त्याचाच एक भाग म्हणून सिंहिकेची नेमणूक केली. तिने प्रल्हादाला मांडीवर घेऊन धगधगत्या चितेवर बसायचे आणि प्रल्हादाला जाळून टाकायचे असे ठरले, पण झाले उलटेच. विष्णूभक्त प्रल्हाद वाचला आणि सिंहिकाच जळून गेली. त्यावेळी प्रल्हादमित्रांनी त्याचा जयजयकार केला. सिंहिकेला शिवीगाळ करत आनंद व्यक्त केला. या घटनेच्या स्मरणार्थ होलिकोत्सव साजरा केला जातो. त्या दिवशी फाल्गून पौर्णिमा होती म्हणून या तिथीला होळी पेटवून शिवीगाळ करतात. होळीमध्ये गुळाच्या प्रतिमा टाकल्या जातात.
श्रीरामाच्या काळात ढुंढा नामक राक्षसी होऊन गेली. लहान पोरांपासून तिला भय होते. तिने ब्रह्मदेवाकडून वर मिळविला होता. त्यामुळे ती उन्मत्त झाली होती. वसिष्ठ ऋषींनी तिला पळवून लावण्याचा उपाय सांगितला. वेशीबाहेर लाकडे-गोवऱ्यांचा ढीग रचून पेटवून द्यायचा. पोरांनी त्याभोवती फिरत आरडाओरडा, शिवीगाळ करत शंखनाद करायचा; त्यामुळे ढुंढा पळून जाईल. पुन्हा येणार नाही. त्याप्रमाणे केले. घाबरून राक्षसी पळून गेली. या कथांतून संदेश मिळतो की, समाजघातक दुष्ट प्रवृत्तींचा नायनाट केला पाहिजे. सत्प्रवृत्ती जपली पाहिजे. धर्मसिंधूत अनेक शास्त्रीय निर्णय, प्रत्येक मासातील उत्सव साजरे करण्याचे विधी सांगितले आहेत. यात होळीचा पूजाविधीही कथन केला आहे. वेशीबाहेर लाकडी ढीग करावा. पौर्णिमेला सायंकाळी हा ढीग पेटवावा. होळीची पूजा करावी. सिंहिकेचे आवाहन करावे. तुपाच्या आहुती तिच्या नावाने घालाव्यात. हाेळीभोवती प्रदक्षिणा घालत शिव्या द्याव्यात. शंखनाद करावा. होळी शांत झाल्यावर राख घरी आणून दुसऱ्या दिवशी अंगाला लावून अभ्यंग स्नान करावे. होळीचे विसर्जन करावे. या उत्सवामागे शास्त्रीय भूमिका आहे.
समाजात सत्प्रवृत्ती तसेच दुष्प्रवृत्तीही असतात. दुष्प्रवृत्तींमुळे समाजात दुराचार वाढतो. तिचा नाश करून सत्प्रवृत्तीची वृद्धी होईल असा प्रयत्न करायला हवा. शिवाय माणूस सभ्यतेचा मुखवटा घालून शिव्या देण्याचे, अपशब्द उच्चारण्याचे टाळतो. परंतु मनातून मात्र जळफळत असतो. या भावनेला दडपण्याऐवजी तिला मुक्त करणे आवश्यक असते. ते होळीच्या निमित्ताने केले, तर मन मोकळे होते. इतर प्रसंगी शिव्या देण्यामागे दुर्भावना असू शकते. त्यामुळे भांडण, द्वेष, हाणामारी होणे शक्य असते. परंतु होळीच्या दिवशी अशी दुर्भावना मुळीच नसते. मोकळेपणी शिवीगाळ करून मनातली वाईट भावना बाहेर फेकता येते. या वेळी केलेली शिवीगाळ कुणा व्यक्तीला उद्देशून केली जात नाही. त्यामुळे कुणाला राग येण्याची शक्यता नसते.
होलिकोत्सवामागची ही मानसशास्त्रीय बैठक आहे. हुताशनी हे तिचे नावच अर्थपूर्ण आहे. हुत म्हणजे हवन केलेले किंवा अर्पण केलेले आणि अशनी म्हणजे खाऊन टाकणारी. आपल्या दुर्भावना होळीत अर्पण केल्या तर ती त्या खाऊन टाकते असा भाव. फाल्गुन पौर्णिमा वर्षाची शेवटची पौर्णिमा. यानंतर जी पौर्णिमा येते ती नव्या वर्षातली पौर्णिमा म्हणून या दिवशी दुष्ट भावना ओकून टाकावी आणि सद््भावना रुजवून वाढवावी हा संदेश हा उत्सव देतो.
होळीसारखे सण इतर देशातही संपन्न होतात. त्याचे स्वरूप काहीसे वेगळे असते. होळी हीन भावनेचा असभ्य सण असल्याचा आक्षेप घेतला जातो. त्याला कारणही आहे. होळीला असभ्य, हीन रूप देण्यात काही अपात्र व्यक्तीच कारण आहेत. होळीच्या निमित्ताने कोणाचा तरी सूड घेणे, त्याच्या घरातील लाकडी सामान होळीत जाळणे असे क्षुद्र प्रकार केले जातात. त्यामुळे या सामाजिक उत्सवाला अवकळा आली आहे. वस्तूत: यात या अपात्र व्यक्तींवर आक्षेप घ्यावा. उत्सवावर आक्षेप घेणे ईष्ट नाही.