(रायगड)
पनवेलमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पनवेल स्थानकाच्या परिसरातून एका २० वर्षीय तरुणीला धमकावून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. ही तरुणी खोपोली येथील हॉटेलमध्ये कामाला आहे. तरुणीला जबरदस्ती रिक्षात बसवून निर्जनस्थळी नेत आरोपींनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर आल्यानं पनवेलमध्ये खळबळ उडाली आहे.
मध्यरात्री कामावरुन सुटून ती साधारण पहाटे दोनच्या सुमारास पनवेलमध्ये आली. ती घरी जाण्यासाठी रिक्षा शोधत असताना दोन अनोळखी तरुण त्याठिकाणी आले. या तरुणांनी महिलेला रिक्षा हवी आहे का, असे विचारले. तिने होकार दिल्यानंतर तरुणांनी तिला आपल्यासोबत येण्यास सांगितले. काही अंतरावर निर्जनस्थळी गेल्यानंतर दोन्ही तरुणांनी या तरुणीला धमकावून त्यांच्यासोबत येण्यास भाग पाडले. यानंतर या २० वर्षीय तरुणीवर दोन नराधमांनी अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली.
तरुणीवर अत्याचार केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर तरुणीनं तातडीनं पोलीस ठाणे गाठत घडलेला सारा प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फूटेज चेक करत काही तासांतच दोनपैकी एका आरोपीला अटक केली आहे. तर एक आरोपी अद्यापही फरार असून पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. पोलिसांकडून पनवेल रेल्वे स्टेशन आणि घटनास्थळाच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फूटेज चेक केले जात आहे. याशिवाय पीडित तरुणीला ज्या रिक्षातून नेण्यात आलं होतं, त्या रिक्षाचाही शोध घेतला जात आहे.