(क्रीडा)
ओडिशातील राऊरकेला येथे सुरू असलेल्या हॉकी वर्ल्डकपमध्ये गुरुवारी भारताने ग्रूप डी वेल्सचा ४ – २असा दमदार पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. हा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा होता. आता क्रॉस ओव्हरमध्ये भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे.
भारताकडून आकाशदीपने २ तर समेशर सिंग आणि हरमनप्रीतने प्रत्येकी १ गोल केला. वेल्सकडून गॅरेथ फ्यरलाँगने ४२ व्या मिनिटाला भारतावर पहिला धक्का दिला. पाठोपाठ जेकब ड्रॅपरनेही गोल करत भारताचे टेन्शन वाढवले.आज झालेल्या सामन्यांत दोन्ही संघांनी पहिल्या १५ मिनिटांत परस्परांवर आक्रमणे केली. मात्र कोणालाही गोल करण्यात यश आले नाही. दुस-या क्वार्टरमध्ये भारताला २१ व्या मिनिटाला गोल करण्याची संधी मिळाली. हमनप्रीतने पेनाल्टी कॉर्नरवर शमशेर सिंगला उत्कृष्ट ड्रॅग फ्लिक दिला. यावर शमशेरने गोलपोस्टचा अचूक वेध घेत भारताचे खाते उघडले.
तिस-या क्वार्टरमध्ये वेल्सने परतफेड करण्यासाठी चांगला जोर लावला. मात्र सामन्याच्या ३१ व्या मिनिटालाच भारताच्या आकाशदीपने भारतासाठी दुसरा गोल करत आघाडी २- ०अशी नेली. भारताच्या या आनंदावर वेल्सच्या गॅरेथ फ्यरलाँगने पाणी फेरले. त्याने ४२ व्या मिनिटाला भारतावर पहिला गोल केला. त्यानंतर अवघ्या २ मिनिटांत जेकब ड्रॅपरने गॅरेथ फ्यरलाँगच्यात पासवर उत्कृष्ट गोल करत सामना २- २ असा बरोबरीत आणला.
चौथ्या आणि शेवटच्या क्वार्टरमध्ये भारताने कोंडी फोडून आघाडी घेण्याचा प्रयत्न केला. आकाशदीपने ४५ व्या मिनिटाला भारताचा तिसरा आणि वैयक्तिक दुसरा गोल केला. त्यानंतर हरमनप्रीत सिंगने पेनाल्टी कॉर्नरचा फायदा उचलत भारतासाठी चौथा गोल केला. अशा प्रकारे भारताने हा सामना जिंकत हॉकी वर्ल्डकपच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.