(मुंबई)
उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर फडतूस गृहमंत्री असल्याची जहरी टीका केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यापुढे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना मर्यादा ओलांडल्या त्यांना भाजपचे कार्यकर्ते घराबाहेर पडू देणार नाहीत, त्यांना घरकोंबडा बनून रहावे लागेल, असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.
ठाण्यामध्ये महिला शिवसेना कार्यकर्ता रोशनी शिंदे यांना मारहाण झाल्यानंतर उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली. एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे, अत्यंत लाचार आणि लाळघोटपणा करणारा उपमुख्यमंत्रिपद मिळालं म्हणून नुसती फडणवीसी करणारा एक माणूस गृहमंत्रिपद मिरवत आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
त्यानंतर उद्धव ठाकरे, त्यांची पत्नी रश्मी ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे यांनी ठाण्यातील रुग्णालयात जाऊन जखमी रोशनी शिंदे यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गृहमंत्री नसून गुंडमंत्री असल्याची टीका केली.
यानंतर आता यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांना भाजपचा हा शेवटचा इशारा आहे. उद्धव ठाकरेंनी आपली मर्यादा ओलांडली तर भविष्यात आम्हाला आमची मर्यादा ओलांडावी लागेल. देवेंद्र फडणवीसची बरोबरी करण्याची उद्धव ठाकरेंची पात्रता नाही. बाळासाहेबांचे टाचणीभरही गुण उद्धव ठाकरे यांच्याकडे नाही. उद्धव ठाकरे यांच्याकडे ना बाळासाहेबांचे विचार आहे, ना त्यांचं हिंदुत्व आहे, ना तसं कर्तृत्व आहे असेही बावनकुळे यांनी म्हणत पलटवार केला आहे.