(रत्नागिरी / प्रतिनिधी)
सापाचे नाव काढताच अंगावर काटा उभा राहतो, त्यात अजस्र अजगर म्हटला की पाहणाऱ्याची बोबडीच वळते. हातखंबा बौद्धवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर असाच एक अजस्र अजगर आढळून आला. मात्र, सर्पमित्रांच्या पुढाकाराने त्याला ताब्यात घेऊन त्याची जंगलात सुखरूप सुटका करण्यात यश आले.
उन्हाळ्याची तीव्रता शिगेला पोहोचली असून, पावसाळ्याची चाहूल लागणार आहे. अशा काळात साप बाहेर निघण्यास सुरुवात होते. त्यात शेताचा परिसर म्हटला की सापाची उपस्थिती गृहीत धरायला हवी. हातखंबा बौद्धवाडी रस्त्या लगत आंब्याच्या झाडामधे रविवारी १९ फेब्रुवारीला रात्री साडेआठच्या सुमारास तरुणांना अजस्र अजगर दिसून आला. त्यांनी आरडाओरड न करता तत्काळ परिसरातील सर्पमित्र राहुल यांना दूरध्वनीवरून अजगराविषयी माहिती देऊन पाचारण केले. लगेच सर्पमित्र राहुल घटनास्थळी दाखल झाले. तोवर अजगराने त्याच भागात ठाण मांडले होते.
सुरुवातीला अजगराला ताब्यात घेण्यात अडचणी येत होत्या. मात्र, अर्धातासाच्या मेहनतीनंतर सर्पमित्र राहुल यांनी अजगराला पकडले. त्यानंतर अजगराला पाहण्यासाठी आलेल्या बघ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. त्याला एका पोत्यात जेरबंद करून सर्पमित्र यांच्या मार्गदर्शनात त्याला जंगलात सोडण्यात आले.