(रत्नागिरी / विशेष प्रतिनिधी)
मुंबई गोवा महामार्गावर हातखंबा गाव येथे ब्रेक निकामी झालेल्या ट्रॅव्हलसने तब्बल सात गाड्यांना जबरदस्त ठोकर देत जुन्या बँकेच्या इमारतीला धडक दिली. ट्रॅव्हल्स चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असून या अपघातामधील जखमींना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरवर्षी आंबा सीजनमध्ये अनेक नेपाळी बांधव कोकणात येत असतात. आलेल्या नेपाळी लोकांना त्यांच्या गावी घेऊन जाण्यासाठी ही ट्रॅव्हल्सअसल्याचे बोलले जात आहे. हातखंब्याच्या दिशेने येणारी ही ट्रॅव्हल्स शेती फार्मच्या उतारात आली असता गाडीचे ब्रेक निकामी झाल्याचे चालक काशिब खान (वय 47, राहणार उत्तर प्रदेश ) याच्या लक्षात आले. यावेळी गाडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. तरीही गाडीचा वेग कमी झाला नाही. त्यामुळे सुरुवातीला इनोवा ( MH 46 AP 4243) गाडीला जोरदार धडक दिल्यावर इनोवा थेट रस्त्यांलगत असलेल्या रेलिंगवर अडकली. त्याच ठिकाणी दुचाकीला ( MH 08 AM 9010) धडक दिली. यामध्ये दुचाकीचा चेंदामेंदा झाला. पुढे दर्ग्याजवळ येऊन स्विफ्ट (MH 24 AS 7482) गाडीला जबरदस्त धडक दिली. यात स्विफ्ट गाडीचा मागचा टायर निखळला. त्यानंतर ब्रेक निकामी ट्रॅव्हल्सने हातखंबा गावात येऊन दोन दुचाकींना ठोकरले. त्या रस्त्याच्या बाजूला पडलेल्या अवस्थेत पाहायला मिळाल्या. याच ठिकाणी जुन्या बँकेच्या इमारतीला ट्रॅव्हल्स धडकली. या धडकेत ट्रॅव्हल्स चालक गाडीतच अडकलेला होता. त्याला स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. तसेच दोन दुचाकींना जोरदार धडक दिल्याने एका दुचाकीचा चक्काचूर झाला. अशा विचित्र अपघातात एका ट्रॅव्हल्सने एकूण सात गाड्यांना धडक दिली. या विचित्र अपघातात शग्गिर अजमिर अंसारी ( वय ३३, राहणार-कोकण नगर), महेश घोणपडे (राहणार, इचलकरंजी)व जितेंद्रकुमार चौगुले (राहणार, इचलकरंजी) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
सुदैवाने या मोठ्या अपघातात कोणतीही जिवीहानी झालेली नाही. मात्र धडक दिलेल्या सातही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघात झाल्यानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच नरेंद्रचार्य महाराज रुग्णवाहिकेचे चालक धनेश केतकर यांच्यासह हातखंबा टॅबचे ASI घनश्याम जाधव, ASI महाडिक, HC संसारे, HC भरणकर, HC लेंडी आदी घटनास्थळी धाव घेतली.
अपघातातील जखमींना नाणिज धाम येथील नरेंद्रचार्य महाराज रुग्णवाहिकेतून तत्काळ रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यानंतर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.