(रत्नागिरी)
नागपूर मार्गावर खेडशी ते हातखंबा या मुख्य रहदारीच्या मार्गावरील दुतर्फा झाडी आणि मोठ्या झाडांच्या फांद्या प्रवाशी वर्गासह वाहनधारकांना धोकादायक ठरत आहेत. दुतर्फा वाढत असलेली झाडी तात्काळ छाटून साफ करण्यात यावी, अशी मागणी वाहनधारकामधून करण्यात येत आहे.
रत्नागिरीकडे जाण्यासाठी मुख्य मार्ग असल्याने या मार्गावर अवजड वाहतूकीसह वाहनधारकांची सतत ये-जा सुरु असते. खेडशी ते हातखंबा या भागात मोठ्याप्रमाणावर दुतर्फा झाडी वाढल्याने समोरून येणारे वाहन दिसत नाहीत. तसेच कंटेनर सारख्या आकाराने उंच व लांब गाड्यांच्या छताला झाडांच्या फांद्या आदळतात. यातून एखादी फांदी गाडीवर किंवा रस्त्यावर पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या भागात सातत्याने लहान-मोठे अपघात होत असतात.
रस्त्याच्या साईडपट्ट्या देखील झाडा-झुडपानी व्यापल्या आहेत. यासोबत रस्त्याकडेला पादचाऱ्यांसाठी जागा नसल्याचेही चित्र दिसून येते. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नाल्याची अनेक ठिकाणी सोयच नसल्यामुळे पाणी रस्त्यावरून वाहत जात असते. या भागांतून नागरिक, वाहनधारक जीव मुठीत घेऊन प्रवास करीत असतात. संबधित विभाग या मार्गाकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
काही वर्षापूर्वी बांधकाम विभागाकडून प्रत्येक विभागवार दोन ते तीन कर्मचारी रस्त्याच्या देखरेखीसाठी ठेवण्यात यायचे. त्यावेळीं हाच खेडशी ते हातखंबा रस्ता पूर्णपणे चोख असायचा. मात्र, सद्यस्थितीत संबंधित विभागाचा एकही कर्मचारी फिरकत नसल्याने रस्त्यालगत झाडी अधिकच वाढत आहे. वळण मार्गावरील झाडी रस्त्यावर आल्याने ती तोडून रस्ता मोकळा करणे गरजेचे आहे. बाजूच्या साईड पट्ट्यासह नाला खुदाईचे काम योग्य रीतीने पूर्ण होण्यासाठी बांधकाम विभागाने याकडे वेळीच लक्ष देऊन रस्ता मोकळा करावा, अशी मागणी आता वाहनधारकासह प्रवाशी वर्गाकडून करण्यात येत आहे.