(रत्नागिरी)
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा- २ अंतर्गत शाश्वस्त स्वच्छतेसाठी गावे हागणदारीमुक्त अधिक (मॉडेल) केली जात आहेत. अशा गावांमधील स्वच्छतेची शाश्वती रहावी यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत दृष्यमान स्वच्छतेकरीता कुटुंब भेटी अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी दिली.
रत्नागिरी जिल्ह्यातील हागणदारीमुक्त अधिक मॉडेल झालेल्या गावांमधून हे अभियान राबविण्यास सुरूवात करण्यात आली. कुटुंब भेटीकरीता सर्व ग्रामपंचायत अंतर्गत सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापनाची कामे हाती घेण्यात आली आहे. काही गावांमध्ये ही कामे पूर्ण झाल्याने गावे मॉडेल म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
कुटुंब भेटी अभियान ग्रामपंचायत स्तरावरील सर्व शासकीय कर्मचारी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्त्या, ग्राम रोजगार सेवक, गट समन्वयक, समूह समन्वयक यांच्यामार्फत राबविले जाणार आहे. गृहभेटीदरम्यान कुटुंबातील सदस्यांना काही प्रश्न विचारून माहिती घेण्यात येणार आहे.
त्यासाठी प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. सार्वजनिक वैयक्तिक, शौचालय, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टीक व्यवस्थापन, मैल गाळ व्यवस्थापन या विषयी प्रश्न विचारले जाणार आहे. याबाबत कुटुंबाला शाश्वत स्वच्छतेविषयी जागृत करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १०१२ गावे हागणदारीमुक्त अधिक मॉडेल झाली आहेत. या गावांमधून कुटुंबभेटी अभियान राबविले जाणार आहेत. सर्व नागरिकांनी अभियानाला सहकार्य करावे असे आवाहन पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांनी केले आहे.