(मुंबई)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना सत्र न्यायालयाने अद्याप दिलासा दिलेला नाही. 22 तारखेच्या आत आम्हाला कामावर रुजू व्हायचंय हे कारण देऊन जामीनासाठी अर्ज केलेल्या एसटी कामगारांच्या पदरी अद्यापही निराशाच आहे.
एप्रिल महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर निर्णय देताना मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला संपात सहभागी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले होते. मात्र काल झालेल्या सुनावणीत सरकारी वकीलांनी जामीन अर्जाला विरोध करत या प्रकरणातली सुनावणी अद्याप सुरु आहे. आतापर्यंत झालेल्या तपासातून पोलिसांना एसटी कर्मचारी आणखी मंत्र्यांच्या घरावर हल्ला करण्याच्या तयारीत होते अशी माहिती मिळाल्याने या प्रकरणातील गुंतागुंत वाढली आहे.
अटकेतील सर्व कर्मचाऱ्यांचा पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यात सहभाग होता. या सर्व कर्मचाऱ्यांना एकाच ठिकाणी ठेवणं शक्य नसल्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अजुनही अनेक कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदवणं सुरु असल्याचं म्हणत सरकारी वकीलांनी कर्मचाऱ्यांना जामीन अर्जाला विरोध केला. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांनी आपण गरीब आणि मध्यमवर्गीय घरातून आल्याचं सांगत आपली कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचं कोर्टाला सांगितलं. परंतू कोर्टाने अद्याप या कर्मचाऱ्यांना कोणताही दिलासा दिलेला नाही.