( रत्नागिरी / प्रतिनिधी )
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आरटीओ कार्यालयाने 13 ते 15 ऑगस्ट हर घर तिरंगा हा उपक्रम राबवण्यासाठी जनजागृती उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी सर्व ड्रायव्हिंग स्कूल तसेच आरटीओंच्या वाहनावर तिरंगा विषयी संदेश देणारी माहितीपर स्लोगन लावण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी या रॅलीला हिरवा सिग्नल दाखवून रॅलीची सुरुवात करण्यात आली. सकाळी 10 वा. जिल्हाधिकारी कार्यालयापासून या रॅलीला प्रारंभ झाला. त्यानंतर आठवडाबाजार, मारुतीमंदिर, आरोग्य मंदिर, साळवी स्टॉप, आरटीओ कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, सीईओ इंदुराणी जाखड, आरटीओ विनोद चव्हाण, ताम्हणकर, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासणे, आरटीओचे कर्मचारी, रत्नागिरी जिल्हयातील ट्रेनिंग स्कूलचे चालक, मालक मोठया संख्येने उपस्थित होते.
या रॅलीच्या शुभारंभप्रसंगी जिल्हाधिकारी बी. एन. पाटील बोलताना म्हणाले की, लोकांमध्ये देशभक्ती निर्माण व्हावी, ज्या लोकांनी देशाच्या विकासात आणि स्वातंंत्र्य युध्दात भाग घेतला अशा सर्व विरांचे स्मरण व्हावे यासाठी जिल्ह्यात सर्व नागरिकांनी हर घर तिरंगा उपक्रम आनंदोत्सव म्हणून साजरा करावा असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, हर घर तिरंगा यानिमित्ताने आज आरटीओ कार्यालयाने आज एक अभियान सुरु केेले आहे. जिल्ह्यातील जेवढे ड्रायव्हिंग स्कूल आहेत ती सर्व वाहने हर घर तिरंगाचा संदेश घेउन जिल्हाभर फिरणार आहेत. तसेच तिरंगा विषयी माहिती देणार आहेत. गावनिहाय संस्थांनी आपापल्या वॉर्डात, चौकांत राष्ट्रभक्तीपर विशेष कार्यक्रम हाती घेउन हा कार्यक्रम आनंदात साजरा करावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, ग्रामपंचायत कार्यालय, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, सेवाभावी संस्था या ठिकाणी तिरंगा उपलब्ध करुन दिलेले आहेत. हा तिरंगा घरावर व्यवस्थितपणे लावावा. तिरंगा लावल्यानंतर सायंकाळी उतरवण्याचे नियम होते. मात्र यामध्ये आता सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे हा तिरंगा रात्री उतरवण्याची गरज नाही. मात्र शासकीय आस्थापनांसाठी ही संहिता पाळणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा लावून आनंदोत्सव साजरा करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.