(आरोग्य)
हर्निया म्हणजे आंत्रगळ किंवा आंत्रवृद्धी किंवा अंत्रनिःसरण. आपल्या पोटातील स्नायू जेव्हा कमजोर बनतात आणि सततच्या खोकल्यामुळे किंवा लघवी व बद्धकोष्ठतेमुळे जोर करावा लागल्यामुळे हर्निया होतो. हर्निया होतो, म्हणजे आपल्या शरीरातील नैसर्गिक किंवा अनैसर्गिक छिद्रांतून एखादा अवयव, इंद्रिय किंवा त्या अवयवाचा भाग बाहेर येतो. पोटाच्या आतील भागात स्नायूंचे मजबूत आवरण असते. हा भाग कमकुवत झाल्यानंतर हर्निया होतो, परिणामी स्नायूंचे आवरण फाटून छोट्या फुग्यासारखा आकार दिसतो. ज्याप्रमाणे फाटलेल्या टायरमधून आतील ट्यूब बाहेर येते त्याचप्रमाणे पोटाचे आतील आवरण पोटाच्या स्नायूंच्या कमकुवत भागातून बाहेर येते व त्याचा आकार लहान फुग्यासारखा दिसतो. हर्नियामुळे अस्वस्थता किंवा तीव्र वेदना जाणवू शकते. पोटातील कमजोर स्नायूंमुळे निर्माण झालेल्या पोकळीत आतडी ओढली जाते. त्यामुळे पोट फुगतं किंवा छोटा-मोठ्या आकाराचा फुगवटा शरीराबाहेर तयार होतो आणि पोट दुखायला लागतं.
हर्निया पुरुष, स्त्रिया तसंच कोणत्याही वयोगटाच्या व्यक्तीला होऊ शकतो. हर्नियाकडे दुर्लक्ष केल्यास तो जीवघेणा ठरू शकतो. अचानक आतडं अडकल्यामुळे जिवाला धोका उत्पन्न होऊ शकतो. अचानक मोठ्या झालेल्या हर्नियामुळे त्यात अडकलेल्या आतड्याचं गँगरीनही होऊ शकतं.
स्त्रियांमधील हर्निया
गरोदर स्त्रियांची सिझेरियन पद्धतीनं झालेली शस्त्रक्रिया किंवा कुटुंबनियोजनाच्या टाक्यांच्या शस्त्रक्रियेतील व्रणातून हर्निया होतो. आडव्या छेदातून शस्त्रक्रिया होण्याचं प्रमाण वाढल्यामुळे आता अशा प्रकारे होणाऱ्या हर्नियाचं प्रमाण कमी झालं आहे. गरोदर स्त्रियांमध्ये गर्भाशयाचा ताण पोटांच्या स्नायूवर पडतो. त्यामुळे ते कमजोर बनतात. पोटावर जास्तीची चरबी निर्माण झाल्यास पोटात पोकळी निर्माण होते आणि आतडी बाहेर येते.
बालकांमधील हर्निया
लहान मुलांच्या बेंबीमध्ये नाळ चिकटलेल्या ठिकाणचे स्नायू कमजोर असतात. लहान मूल रडताना बऱ्याचवेळा बेंबी फुगलेली दिसते. हे लक्षण आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. अनेकदा वयाच्या चौथ्या वर्षापर्यंत बालकांमधील हर्निया बरा होतो.
पुरुषांमधील हर्निया
पोटातील आतडी त्या भागाच्या वर असलेल्या मेदाच्या आवरणासहित स्नायूंमधून बाहेर येण्याचं प्रकार पुरुषांमध्ये अधिक आढळून येतात. पोटाचे स्नायू जन्मतः कमजोर असल्यास उतारवयात जांघेत हर्नियाचा फुगा तयार होतो. या प्रकाराला प्रत्यक्ष हर्निया असं संबोधलं जातं. तरुण मुलांमध्ये अप्रत्यक्ष जांघेचा (इन्ग्विनल) हर्निया मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. जांघेच्या वरच्या बाजूला हा हर्निया निर्माण झालेला असतो. त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यास वीर्योत्पादक ग्रंथीतील रक्तस्रावावर परिणाम होऊ शकतो.
हर्नियाची ही आहेत सात लक्षणं
पोटात दुखणे, गुदद्वारा (अॅनस)जवळ खाज येणे ही आपल्याला सामान्य लक्षण वाटू शकतात. परंतू ही सारी ‘हर्निया’ या आजाराची लक्षणं असू शकतात. वेळीच याकडे लक्ष न दिल्यास त्यातील गुंतागुंत अधिक वाढू शकते. काही शस्त्रक्रिया, लठ्ठपणा, बद्धकोष्ठता, कमजोर स्नायू यामुळे हर्निया जडू शकतो.
१ पोटाजवळ किंवा गुदद्वाराजवळ फुगवटा आल्यासारखे वाटल्यास तात्काळ डॉक्टरकडे तपासणी करून घ्या
२ मांडीजवळ किंवा गुद्द्वाराजवळ खाज येणे ही हर्नियामधील सुरवातीच्या ट्प्प्यातील लक्षण आहेत. त्यामुळे ही लक्षण दुर्लक्षित न करता वेळीच उपचार केल्यास हर्निया रोखण्यास मदत होते.
३ मलविसर्जनाच्या वेळेस रक्त पडणे किंवा त्या भागाजवळ ताण येत असल्यास वेळीच लक्ष द्या. यासोबतच मळ्मळणे किंवा उलट्या होणे ही हर्नियाची लक्षण आहेत.
४ हायएटल हर्निया हा पोटाच्या वरच्या बाजूला होतो. यामध्ये पित्त होणे, छातीत जळजळ होणे अशी लक्षणं आढळतात.
५ बेंबी, मांडी, गुदद्वाराजवळ वेदनादायी फुगवटा जाणवत असल्यास ते हर्नियाचे लक्षण आहे.
६ तीव्र बद्धकोष्ठतेच्या त्रासासोबत मलविसर्जनातून रक्त जाणे हे पोटाजवळील हर्नियाचे लक्षण आहे. अशावेळेस उठता-बसताना ताण आल्याने तेथील स्क्रीन अधिक वाढू शकते.
७ झोपल्यावर पोटाजवळचा फुगवटा जाणवत नाही मात्र उभे राहिल्यावर किंवा पोटावर दाब दिसल्यास पुन्हा जाणवणे हे दुर्लक्षित करू नका. त्याचा आकार दिवसेंदिवस किंचित वाढत असल्याचे जाणवत असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या, हा हर्नियाचा प्रकार असू शकतो
हर्नियाची कारणे काय आहेत ?
स्त्रिया व पुरुष या दोघांमध्येही हर्निया होऊ शकतो. हर्निया जन्मजात देखील असू शकतो किंवा काही वेळेस पोटाच्या स्नायूंचे आवरण कमकुवत झालेल्या भागांमध्ये हर्निया निर्माण होऊ शकतो. पोटाच्या आतील भागावर अधिक दाब पडून पोटाच्या स्नायूंचे आवरण कमकुवत होते आणि हर्निया होऊ शकतो. याची काही कारणे पुढीलप्रमाणे आहेत –
१ दीर्घकाळ खोकला
२ दुखापत किंवा शस्त्रक्रिया झाल्यामुळे जखमा.
३ गर्भधारणे दरम्यान, पोटात दाब येतो.
४ दीर्घकालीन बद्धकोष्ठता
५ अवजड वस्तू उचलणे
६ अचानक वजन वाढणे
७ सतत शिंका
८ वाढते वय
हर्नियाचे विविध प्रकार आढळतात मात्र त्याची लक्षणं ही सारखीच असतात. फार उशीर न केल्यास वाढणारा फुगवटा कमी करणे शक्य आहे. त्यामुळे आजाराबाबत अधिक भीती बाळगून किंवा शरम वाटून हा आजार लपवू नका. यामुळे भविष्यात त्यातील गुंतागुंत अधिक वाढत जाते.