(मुंबई)
गाझा पट्टीत इस्त्रायल व हमास अतिरेकी संघटनेत सुरू असणाऱ्या युद्धात भारतीय वंशाच्या 2 महिला सैनिक शहीद झाल्या आहेत. यापैकी 1 महिला जवान महाराष्ट्राची असल्याची माहिती मिळाली आहे. इस्त्रालय लष्कर व तेथील भारतीय समुदायाने या घटनेची पुष्टी केली आहे.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, लेफ्टनंट ऑर मेसेस (22) व इन्स्पेक्टर कीम डोक्राकर अशी 2 शहीद महिला जवानांची नावे आहेत. यापैकी डोक्राकर ही महाराष्ट्रीयन असल्याचे सांगितले जात आहे. मोसेस ही होम फ्रन्ट कमांड, तर कीम डोक्राकर बॉर्डर पोलिस ऑफिसमध्ये तैनात होती. 7 ऑक्टोबर रोजी हमासने केलेल्या हल्ल्यात या दोघी शहीद झाल्या.
भारतातील अनेक नागरिक काही वर्षांपूर्वी इस्त्रायलला स्थायिक झाले. त्यानंतर त्यांच्या पुढच्या पिढ्याही तिथेच जन्मल्या. त्यामुळे त्यांना तेथील नागरिकत्व मिळाले. इस्त्रायलकडून शहीद झालेल्या 2 महिला जवानही ज्यू होत्या. इस्त्रायलच्या नियमांनुसार, सर्वच नागरिकांना लष्करात 3 वर्षांची सेवा देणे बंधनकारक आहे. असे न करणाऱ्या नागरिकांना काही विशिष्ट सुविधांपासून वंचित ठेवले जाते. इस्त्रायलच्या भौगोलिक परिस्थितीनुसार स्वसंरक्षण व देशाच्या संरक्षणासाठी हा नियम बनवण्यात आला आहे.
दुसरीकडे, इस्त्रायलमधील भारतीय समुदायाने तेथील गंभीर परिस्थिती कथन केली आहे. हमासने शेकडो नागरिकांचे अपहरण केले आहे. त्यामुळे या युद्धात ठार झालेल्या भारतीय वंशाच्या नागरिकांच्या आकड्यांत मोठी वाढ होऊ शसकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. भारतीय वंशाची शहाफ टॉकर नामक 24 वर्षीय महिला गत 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या हमासच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.