( मुंबई )
अभिनेता अक्षय कुमार स्वातंत्र्यदिनी भारतीय नागरिक झाला आहे. अक्षयने ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत भारतीय नागरिकत्त्व मिळाल्याची माहिती दिली आहे. अनेक चित्रपटांतून देशप्रेमी पात्र रंगवणाऱ्या अक्षय कुमारकडे याआधी कॅनडाचे नागरिकत्व होते. त्यामुळे त्याच्यावर बऱ्याचदा टीका केली जात होती. अनेकदा सोशल मीडियावर ‘कॅनडा कुमार’ म्हणून ट्रोल केले जात होते. भारतात भरावा लागणारा कर वाचवण्यासाठी त्याने कॅनडाचे नागरिकत्व घेतले होते, असेही म्हटले जात होते.
कॅनडाच्या नागरिकत्वावरून सातत्याने टीका होत असताना अक्षयने २०१९ मध्येच भारतीय नागरिकत्व परत मिळण्यासाठी अर्ज केला होता. आज अखेरीस त्याला भारताचे नागरिकत्व मिळाले. स्वार्थ पाहून अक्षय भारतीय नागरिक झाला, अशी टीका भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतरही त्याच्यावर होत आहे. अक्षय कुमार व्यतिरिक्त अभिनेत्री आलिया भट्टकडे ब्रिटिश नागरिकत्व आहे. तिच्याकडे ब्रिटनचा पासपोर्टही आहे.
अक्षयने डॉक्युमेंटचा फोटो शेअर करत असे लिहिले की, ‘दिल और सिटिझनशिप, दोनो हिंदुस्तानी.’ अर्थात अक्षयने म्हटलं की माझं मन आणि नागरिकत्व दोन्हीही भारतीय आहे. त्याने पुढे लिहिले की, ‘स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा! जय हिंद!’ दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून अक्षयला त्याच्या कॅनेडियन नागरिकत्वावरून प्रचंड ट्रोल केले जात आहे. त्याला कॅनडा कुमार म्हणूनही संबोधले जायचे. त्यामुळे आता त्याला ट्रोल करणाऱ्यांची बोलती बंद होईल, असे म्हटले तरी वावगं ठरणार नाही.
दरम्यान कॅनडाच्या नागरिकत्वावरुन सातत्याने टीका होत असताना अक्षयने २०१९ मध्येच भारतीय नागरिकत्व परत मिळण्यासाठी अर्ज केला होता. अक्षय म्हणालेला की, ‘माझ्यासाठी भारतच सर्वस्व आहे, मी जे काही कमावले, जे काही मिळालं ते इथूनच आहे. हे सर्व परत देण्याची संधी मला मिळाली याबाबत मी भाग्यवान आहे. जेव्हा लोक समजून न घेता काहीही बोलतात तेव्हा वाईट वाटते.’
१९९० च्या दशकात अक्षयचे लागोपाठ अनेक चित्रपट फ्लॉप झाले होते. त्याने सांगितले की त्याच्या चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसवरील खराब कामगिरीने त्याला कॅनेडियन नागरिकत्वासाठी अर्ज करण्यास प्रवृत्त केले. अक्षय म्हणाला, ‘मला वाटलं होतं की माझे चित्रपट चालत नाही आहेत आणि मला काम करायचं आहे. मी तिथे कामासाठी गेलो होतो. माझा मित्र कॅनडात होता आणि तो म्हणाला – इकडे ये. मी अर्ज केला आणि निघालो.’